भ्रष्टाचारी नेते गजाआडच झाले पाहिजेत- उदयनराजे भोसले

March 20, 2016 7:49 PM0 commentsViews:

Udayan raje bhosll213

सातारा -20 मार्च : धरणं, कालवे भ्रष्टाचाराने भरल्यानेच शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली, असं सांगात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भ्रष्टाचारी नेते गजाआडच झाले पाहिजेत अशी भावना व्यक्त केली. ते आज सातार्‍यात बोलत होते.

सध्या राज्यात जलजागृती सप्ताह साजरा केला जातो आहे, मात्र अशा वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी जलसिंचन योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा काढून आपला राग व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे उदयनराजेंनी कवितेद्वारे त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना त्यांनी घरचा अहेर दिला आहे.

भ्रष्टाचाराने ज्यांनी धरणे व पाणलोट केलं भकास, व स्वत:ची घरं केली झकास…
सामाजिक परिस्थिती केली उदास, त्यांना जनताच लावेल धसास…

‘पूर्वी पाणी आडवा, पाणी जिरवा अशी घोषणा होती. मात्र आता स्वत:च्या स्वार्थासाठी लोकांना आडवा आणि लोकांची जिरवा असा प्रकार सुरू झाला आहे. त्याचा गाभा हा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार झाला नसता तर धरणं पूर्ण झाली असती, लोकांपर्यंत पाणी पोहचलं असतं. त्यामुळे ज्यांनी कोणी भ्रष्टाचार केला आहे, त्यावर कारवाई गरजेची आहे. जनतेवर आलेले हे नैसर्गिक संकट आहे. अनेक ठिकाणी पाण्यामुळे गाव सोडून लोक चाललेत, संचारबंदी लागलेली अवस्था झाली आहे. त्यामुळे भ्रष्ट झालेला प्रत्येक नेता हा गजाआडच झालाच पाहिजे’, अशी मागणी उदयनराजे यांनी आवर्जून केली.

दरम्यान, भारतमाता की जय ही काही शिवी नाही. भारत हा आपला देश आहे. त्याचा जयजयकार करायला कोणाला का लाज वाटते. राष्ट्रप्रेम ढासळले तर देश अखंड राहणार नाही. बघता बघता त्याचे तुकडे होतील. कोणीही मूठ भर लोकांच्या विचारांना, राजकारणाला बळी पडू नका. सर्व पक्षांना माझी हात जोडून विनंती आहे, कोणीही जातीय तेढ निर्माण करू नका,’ असं आवाहनही उदयनराजेंनी केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close