श्रीहरी अणे उद्या देणार राजीनामा?

March 21, 2016 6:38 PM0 commentsViews:


vidhan_sabha3मुंबई – 21 मार्च : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना वेगळा मराठवाड्यावर बोलणं महागात पडण्याची दाट शक्यता आहे. विधानसभेत या त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी श्रीहरी अणे यांना निलंबित करा अशी मागणी लावून धरलीये.  महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही कारवाई होणार असे संकेत देत उद्या मुख्यमंत्री याबाबत निर्णय जाहीर करतील असं स्पष्ट केलं. दरम्यान, या वादानंतर अणे राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

वेगळ्या विदर्भाला पाठिंबा दिल्यावर आता वेगळ्या मराठवाड्याचीही मागणी ही योग्य आहे. मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झालाय असं मत अणे यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा आज विधानसभेत मुद्दा गाजला. शिवसेनेनं श्रीहरी अणेंविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणे यांना निलंबित केलं नाही तर शिवसेनेचे मंत्री कॅबिनेटच्या बैठकीला जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आलाय. सर्वच राजकीय पक्षांनी अणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत अणेंना निलंबित करा अशी मागणी केली होती. त्यामुळे दिवसभरात 3 वेळा कामकाज तहकूब करण्यात आलं, त्यानंतर एकनाथ खडसे बोलण्यासाठी उभे राहिले असा विरोधकांनी अणेंच्या निलंबनाच्या मागणीसाठी गोंधळ घातला. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं. अणेंचं व्यक्तव्य अयोग्य आहे. सरकार त्यांना पाठिशी घालणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल. मुख्यमंत्री याबाबत उद्या भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती दिली.

त्याआधी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी श्रीहरी अणेंना बडतर्फ करण्याची मागणी केलीय. तर शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी अणेंच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचं सांगितलं. तर शेकापच्या गणपतराव देशमुख यांनीही अणेंची हकालपट्टी करण्याची मागणी केलीय. विधान परिषदेमध्येही विरोधकांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली. अणेंना महाअधिवक्ता पदावरून दूर करा अशी मागणी विरोधकांनी केली. त्यांना हा अधिकार कोणी दिला असा प्रश्न त्यांनी विचारला. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांच्या कामकाजामध्ये अडथळे आले आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करावं लागलं.

मुख्यमंत्री सभागृहात आल्यावर आपण सर्व गटनेत्यांची बैठक घेऊ. त्यात विरोधी पक्षाचे नेतेही असतील. बैठक झाल्यावर आपण अणेंबाबत सभागृहात निर्णय घेऊ असं उत्तर संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी दिलं.

तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, अणेंच्या मुद्द्यावर सोयीस्कर मौन बाळगलंय. मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDAच्या कार्यक्रमात पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना अणेंसंदर्भात प्रश्न विचारला. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close