खाकीतली संवेदनशीलता! पोलिसांच्या तत्पर्तेमुळे वाचला 2 शेतकर्‍यांचा जीव

March 21, 2016 4:06 PM0 commentsViews:

 

सिध्दार्थ गोदाम, औरंगाबाद- 21 मार्च : पोलीसांची प्रतिमा आपल्यासमोर नेहमीच वाईट अशीच येत असते, मात्र औरंगाबाद पोलीसांनी एका गुन्ह्याचा तपास एका दिवसात करून पोलीस काय करू शकतो याचं उदाहरण दाखवून दिलंय. आहे. औरंगाबादमध्ये कापूस विकून पैसे घरी नेणार्‍या शेतकर्‍याला भामट्यांनी दिवसाढवळ्या लुटले. मात्र सेफ सिटी अंतर्गत बसवलेल्या कॅमेर्‍यात भामटे अडकले आणि अवघ्या 24 तासांत पोलीसांनी या गुन्ह्याचा तपास लावल्याने दोन शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यापासून रोखलं.

AUR Shetkar

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कौडगावचे कापुस उत्पादक शेतकरी देवराव पुंड आणि शेख रियाझ, या दोघांच्याही चेहर्‍यावर आज औरंगाबाद पोलीसांमुळे हसू आहे. पण काल त्यांच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. शेख रियाज आणि देवराव बाबा हे दोघे गावातील शेतकर्‍यांचे कापुस विकून आलेले बारा लाख घेऊन मोटारसायकलवर जात होते. शहरातल्या जालना रोडवरून जात असतांना दोन भामट्यांनी चालत्या गाडीवरून देवराव पुंड यांच्या हातातून पैसे हिसकावून पळ काढला.

पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या टीमकडे याची जबाबदारी दिली. शेवटी भामटे सीसीटीव्हीच्या आकाशवाणी चौकातल्या कॅमेर्‍यात पळून जातांना दिसले. सीसीटिव्हीच्या आधारे केवळ चोवीस तासांच्या आत पोलीसांनी 12 लाखांसहित आरोपी ताब्यात घेतलं. शेख रियाज याच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि देवराव पुंड यांना इतर शेतकर्‍यांना पैसे द्यायचे होते. हे पैसे त्यांना परत मिळाले नसते तर…

पोलीसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन लगेच यंत्रणा कामाला लावली आणि दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखल्या. यावेळी पोलीस आयुक्त स्वत: तपासावर लक्ष ठेवून होते. त्यामुळे पोलीस नागरिकांचा मित्र असतो, हेच औरंगाबादच्या पोलीसांनी पुन्हा दाखवून दिलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close