मुख्यमंत्री, आईच्याही इभ्रतीचे गांभीर्यानं पाहा !, सेनेचा घणाघात

March 22, 2016 9:25 AM0 commentsViews:

samana_on_aney3422 मार्च : ओवेसी आणि श्रीहरी अणे यांची मानसिकता सारखीच आहे, पण ओवेसीची जीभ कापून आणणार्‍यास लाखोचे इनाम लावणारे भाजपवाले महाराष्ट्रद्रोही श्रीहरी अणेंच्या बाबतीत इतके बुळबुळीत का झाले आहेत? असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री, आईच्याही इभ्रतीचे गांभीर्यानं पाहा अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीस सरकारला धारेवर धरलंय. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये अणेंवर घणाघाती टीका करण्यात आलीये.

वेगळ्या मराठवाड्याची भूमिका मांडून महाधिवक्ता श्रीहरी अणे पुन्हा एकदा शिवसेनेच्या रडारवर आले. सोमवारी विधानसभेत सेनेनं कडाडून विरोध केल्यानंतर आज ‘सामना’मधून अणे आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री, आईच्याही इभ्रतीचे गांभीर्यानं पाहा! अशा मथळ्याखालच्या आजच्या अग्रलेखात भाजपला धारेवर धरलंय. महाराष्ट्रद्रोह करणारे अणे जितके गुन्हेगार त्यापेक्षा जास्त गुन्हेगार हा महाराष्ट्रद्रोही मांडीवर घेऊन कुरवाळणारे राज्यकर्ते आहेत, अशी टीका सामन्यातून करण्यात आली आहे.

ओवेसी आणि अणे यांची मानसिकता सारखीच आहे, पण ओवेसीची जीभ कापून आणणार्‍यास लाखोचे इनाम लावणारे भाजपवाले महाराष्ट्रद्रोही श्रीहरी अणेंच्या बाबतीत इतके बुळबुळीत का झाले आहेत? शिवाजीराजांच्या आशीर्वादाची भाषा निवडणुकीपूर्वी करणारे मित्रवर्य अफझलखानाचा महाराष्ट्र तोडो विडा का रंगवत आहेत? मुख्यमंत्री, महाराष्ट्र ही तुमची आई आहे. तिच्याही इभ्रतीचे गांभीर्याने पाहा!, असा टोला आजच्या अग्रलेखात लगावण्यात आला आहे. सामनामध्ये पुढे म्हटलंय की, श्रीहरी अणे नामक फालतू माणूस महाराष्ट्राच्या ऍडव्होकेट जनरलपदी नेमून मुख्यमंत्र्यांनी काही बरे केले नाही. महाराष्ट्राच्या बाबतीत हा अणे इतक्या माकडचेष्टा करूनही मुख्यमंत्री त्याच्याबाबतीत इतके हळवे राहतात हे काही खंबीर राज्यकर्त्यांचं लक्षण नाही अशी परखड टीकाही करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close