महापुरुषांची जयंती आणि सणांच्या दिवशी ड्राय डे ?

March 23, 2016 9:27 AM0 commentsViews:

23 मार्च : राज्यात ड्राय डेजची संख्या वाढू शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, रामनवमी, ईद मिलादुनब्बी, महावीर जयंती, गुरुनानक जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती आणि ख्रिसमस या सणांच्या दिवशी ड्राय डे जाहीर करण्याची तयारी सरकार करतंय. एखाद्या जिल्ह्यात तशी मागणी होत असेल तर त्या त्या दिवशी जिल्हाधिकारी तसा निर्णय घेऊ शकतात, तसे अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी विधानपरिषदेत दिली.

drydayविधान परिषदेत शरद रणपिसे, संजय दत्त, मुझफ्फर हुसेन, भाई जगताप, प्रकाश गजभिये यांनी राज्यात दारुबंदी करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आणि इतर सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध आणि इतर महापुरुषांच्या जयंतीदिनी तसंच अन्य सणांच्या दिवशी दारुबंदी करावी, अशी मागणी केली. लोकांची मागणी असल्यास एखाद्या सणाला त्या दिवसापुरती दारुबंदी करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उत्पादन शुल्क राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.

एकनाथ खडसे म्हणाले की, अधिकृत दारूबंदी केली तर हातभट्टया वाढतील, त्यातून दुर्घटना घडतील. यापूर्वी कधीही दारूबंदीचा विचार केला नाही, उलट 1972 पासून दारू विक्रीला सरकारने प्रोत्साहनच दिले आहे. राज्यात 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 30 जानेवारी शहीद दिन, 1 मे महाराष्ट्र दिन, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, आषाढी आणि कार्तिकी एकादशी या निमित्त दारुबंदी असते.

आता लोकांची मागणी असेल, तर आंबेडकर जयंती, बुद्धजयंती आणि इतर सणांच्या दिवशीही दारुबंदी करण्याचा विचार केला जाईल, त्यासंबंधीचे निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत, असं खडसे यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close