जातपंचायतीच्या बहिष्कारामुळे 16 तासांनंतर महिलेवर अंत्यसंस्कार

March 23, 2016 4:39 PM0 commentsViews:

Dapoli1213

दापोली-23 मार्च : दापोलीमध्ये जातपंचायतीच्या हिटलरशाहीचा नमुना पाहण्यास मिळाला. एका कुटुंबावर 5 वर्षांपासून बहिष्कार टाकलाय. कौर्याची सीमा म्हणजे या कुटुंबातील वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास पंचायतीने मनाई घातली होती. त्यामुळे 16 तासांनंतर या महिलेवर पोलिसांच्या उपस्थिती अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी वाळीत प्रकरणी जातपंचायतीच्या सदस्यांना अटक करण्याचे आदेश समाज कल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिले आहेत.

दापोलीतल्या देहण गावात गेली 5 वर्षं वाळीत असलेल्या कुटुंबातल्या तुकाराम जगदाळे याना आपल्या आईचे अंत्यसंस्कार करण्यास या गावकीने आडकाठी तर केलीच पण जगदाळे यांच्या नातेवाईकानाही प्रेत उचलण्यास मज्जाव करून धमकी दिली. अखेर दु:खात असलेल्या जगदाळे यांच्या नातेवाईकांपैकी कुणीतरी पोलिसांना कळवताच पोलीस बंदोबस्तात तब्बल 16 तासांनंतर या दुदैर्वी वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जगदाळे याना करणी, भुताटकी करतो म्हणून देहण गावातल्या गावकीने गेली पाच वर्षं वाळीत टाकलंय. याबद्दल जगदाळेनी अनेदा पोलिसांत तक्रारही केलीय. मात्र, याची दखल घेतली गेली नसल्यामुळे या पीडित कुटुंबाला आपल्या घरातल्याचेही अंत्यसंस्कार करण्यापासून रोखण्यापर्यंत या गावकीची मजल गेली आहे. एवढा सगळा अमानुष प्रकार होऊनही पोलिसांनी गावकीतल्या पुढार्‍यापैकी एकाही कुणावर अद्याप गुन्हा दाखल केलेला नाहीये. उलट गावकर्‍यांनीच पीडितांना मदत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित तुकाराम जगदाळे यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close