ठाण्यात पुन्हा हिट अँड रन; तरुणाचा जागीच मृत्यू, तर मामाची प्रकृती चिंताजनक

March 28, 2016 9:32 AM0 commentsViews:

Thane Accident

ठाणे – 28 मार्च : भल्या पहाटे स्कुटीवरून वृत्तपत्राचे गठ्ठे आणायला जाणार्‍या मामा भाच्याच्या भरधाव वेगाने आलेल्या कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. या धडकेत भाचा जागीच ठार झाला, तर मामा ज्युपिटर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. सचिन पवार (28) असं मृत्युमुखी पडलेल्या वृत्तपत्र विक्रेत्याचे नाव आहे.

सचिन पवार आणि हेमंत जाधव हे मामा भाचे काल सकाळी राम मारुती रोडवरून आपल्या ऍक्टीव्हाने वृत्तपत्राचे गठ्ठे आणायला जात होते. यावेळी शेखर इतरडकर याने निष्काळजीपणाने ह्युंदाई वर्ना कार चालवत ऍक्टीव्हाला जोरदार धडक दिली. या धडकेत सचिन पवार याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर त्याचा मामा हेमंत जाधव यांना डोक्याला जबर मार लागल्याने जुपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी शेखर याने अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आणि तो अजूनही फरारच आहे. शेखरचे वडील हे ठाणे महापालिकेमध्ये अभियंता आहेत.

गेल्या सोमवारी आकांक्षा आणि सुरभी या दोन मैत्रीणींचा ठाण्यातच अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.

दरम्यान आरोपी शेखरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close