गणेश पांडे प्रकरण : पीडित महिलेचा ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदवण्याचे सभापतींचे आदेश

March 29, 2016 5:45 PM0 commentsViews:

ganesh pande

मुंबई – 29 मार्च :  विनयभंगाचा आरोप असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचा मुंबई अध्यक्ष गणेश पांडे प्रकरणावरून आज (मंगळवारी) विधान परिषदेत विरोधी पक्षांसह शिवसेनेच्या महिला आमदारांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पीडित महिलेचा इन कॅमेरा जबाब नोंदवावा. तसंच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारपर्यंत सभागृहात निवेदन द्यावं, असे आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी या प्रकरणावरून सरकारवर तीव्र टीका केली. गणेश पांडे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली.

मथुर्‍यात झालेल्या पक्षाच्या बैठकी वेळी हॉटेलमधील खोलीत बोलावून अश्लील प्रश्न विचारणे तसंच पाठलाग केल्याची तक्रार एका महिला कार्यकर्तीने केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, पक्षपातळीवरही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. त्या संदर्भात आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघटनमंत्री रविंद्र भुसारी यांच्यात झालेल्या बैठकीत याविषयीची चर्चा झाल्याचं समजतं. या विषयावरून विरोधकांसह शिवसेनाही भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, गणेश पांडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. हा महिलांच्या अस्मितेचा विषय आहे. असे वर्तन करणारा कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचे नाही. मात्र, अशा वृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

close