अखेर विजय मल्ल्या नरमले, बँकांचे 4000 कोटी सप्टेंबरपर्यंत फेडणार

March 30, 2016 1:25 PM0 commentsViews:

vijay_mallyaनवी दिल्ली – 30 मार्च : कर्जबुडवे उद्योजक विजय मल्ल्यानी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. या वर्षांच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत 4000 कोटी भरायला तयार असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली आहे. पण, भारतात परतण्यास मल्ल्यांनी नकार दिलाय.

देशभरातील वेगवेगळ्या बँकांकडून कोट्यवधीचं कर्ज घेऊन कर्जबाजारी झालेले विजय मल्ल्या देशसोडून लंडनला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली. विजय मल्ल्या देश सोडून पळून गेले अशा चर्चेला ऊत आला. या प्रकरणाचे पडसाद लोकसभेतही उमटले. त्यानंतर आपण देश सोडून पळालो नाही अशी सारवासारव मल्ल्यांनी केली. पण, बँकांचे थकीत कर्ज कधी फेडणार हे मात्र मल्ल्यांनी स्पष्ट केलं नव्हतं. अखेर या प्रकरणी बँकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज कोर्टात झालेल्या सुनावणीत विजय मल्ल्यांने बँकाचे थकीत कर्ज देण्यास तयारी दर्शवलीये.  मल्ल्याच्या प्रस्तावावर विचार करायला वेळ द्या असं या संबंधित बँकांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे.

सध्या भारतात परतण्यासारखं वातावरण नसल्यामुळे मल्या भारतात परतणार नाही असं सुप्रीम कोर्टात त्याच्या वकिलांनी सांगितलं आहे. प्रसारमाध्यमं या प्रकरणी अतिशयोक्ती करतायत त्यामुळे बँकांशी होत असलेल्यावाटाघाटी गुप्तच राहाव्यात अशी भूमिका यावेळी मल्ल्याच्या वकिलांनी मांडली. पण, प्रसारमाध्यमं ही जनतेच्या हितासाठी काम करतात असं म्हणत न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी मल्ल्यांचा वकिलांना फटकारलं. मल्ल्याचे वकील याबाबत बँकांशी वाटाघाटी करणार आहेत. याबाबतची पुढची सुनावणी 7 एप्रिलला होणार आहे. अखेर कोट्यवधी रुपये बुडण्याच्या धास्तीने हवालदील झालेल्या बँकांना अखेर सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला असून लवकरच सप्टेंबरपर्यंत मल्ल्या तब्बल 4000 कोटींची रक्कम भरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close