मंदिरात प्रवेश करण्यापासून महिलांना रोखता येणार नाही – हायकोर्ट

March 30, 2016 8:40 PM0 commentsViews:

M_Id_404282_mumbai_high_court

मुंबई – 30 मार्च : कायद्यानुसार शनि शिंगणापूर मंदिरात प्रवेश करण्यापासून महिलांना रोखता येणार नाही, असे मुंबई हायकोर्टाने आज (बुधवारी) स्पष्ट केलं. ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश मिळतो, तिथं महिलांना प्रवेश मिळायलाच हवा. त्यांना कुठेही प्रवेश नाकारता येणार नाही, असं मत मुंबई हायकोर्टानं आज व्यक्त केलं. तसंच, या प्रकरणी राज्य सरकारनं दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, असा आदेशही कोर्टानं दिला.

शनिशिंगणापूर इथल्या शनी मंदिरातील चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यावरून सध्या वाद सुरू आहे. स्थानिक गावकरी आणि मंदिर प्रशासनानं रुढी-परंपरांचा हवाला देत महिलांना चौथर्‍यावर प्रवेश देण्यास नकार दर्शवला आहे. तर, ‘भूमाता ब्रिगेड’ या संघटनेनं महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी आंदोलन सुरू केलं आहे.

दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं वाद चिघळत असतानाच या प्रश्नी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी जात धर्म लिंग असा भेद न करता मंदिरांमध्ये सर्व स्त्री-पुरुषांना प्रवेश मिळावा असा कायदा 1956 साली आला तरी अजून अंमलबजावणी होत नाहीय म्हणून हायकोर्टात  धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली असता कोर्टानं वरील मत व्यक्त केलं. याप्रकरणाची पुढील सुनावणी 1 एप्रिल रोजी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close