फिल्म रिव्ह्यु : ‘रंगा पतंगा’

April 2, 2016 6:50 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

ब्लॅक कॉमेडी किंवा डार्क कॉमेडी म्हणजे काय ते आपण अनेक नाटक, सिनेमांमधून पाहिलेलं आहे. ‘रंगा पतंगा’ हा पूर्णपणे ब्लॅक कॉमेडी म्हणता येईल असा सिनेमा नसला तरी जे प्रासंगिक विनोद आहेत ते हलाखीच्या परिस्थितीतून तयार झोलेल आहेत. प्रेक्षकांना आवडावं म्हणून काहीतरी विनोदी प्रसंगांची पेरणी करुयात आणि अशी साखरपेरणी करत सामाजिक संदेश देऊया अशी चापलुसी यामध्ये नाही. एक ‘हजाराची नोट’ सारख्या सिनेमात जसं आपल्याही नकळत आपण हसतो, अगदी तसाच अनुभव हा ‘रंगा पतंगा’ देतो. जे जे या कलाकृतीशी संबंधित आहेत, मग ते लेखक असो, तंत्रज्ञ असोत किंवा कलाकार असोत सर्वांचे प्रामाणिक प्रयत्न संपूर्ण सिनेमात जाणवतात, हे सांगावंच लागेल. हा अनुभव प्रत्येक प्रेक्षकाला आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच सध्या जे काही मराठी सिनेमे रिलीज होतायत, त्यात हा रंगा पतंगा उठून दिसतो.

काय आहे स्टोरी ?ranga_1

एका शेतकर्‍याचे दोन बैल हरवलेत, रंगा आणि पतंगा…ज्या बैलांवर मुलासारखं प्रेम केलं ते बैल हरवल्यामुळे शेतकरी आणि त्याची पत्नी यांना जेवण गोड लागत नाहीये. आता हा फक्त दुष्काळी भागातला शेतकरी नाही, तर त्याचा धर्म आहे मुस्लिम… दुष्काळ कव्हर आलेल्या मीडियाला हा विषय इंटरेस्टिंग वाटतो आणि मग पुढे काय काय घडतं आणि घडवलं जातं त्याची गोष्ट आहे रंगा पतंगा…सुदैवाची गोष्ट म्हणजे या सिनेमाचा पीपली लाईव्ह होत नाही, पण न्यूज चॅनेलचा, मीडियाचा रोल इंटरव्हलनंतर बराच वाढतो.

चॅनेलवर चालणार्‍या चर्चेची ज्या पद्धतीने खिल्ली उडवली तेसुद्धा टाळायलाच हवं होतं. तेवढा भाग लेखक आणि दिग्दर्शकाने कथेशी फारकत घेतल्यासारखं वाटतं. वाहिन्यांमधली स्पर्धा समजू शकते, पण पुढे त्यांचं महत्त्व वाढलं आणि बिचारा शेतकरी बाजूला राहिला, शेतकरी आणि त्याचा मित्र प्रेक्षक म्हणून आपल्याला महत्त्वाचे असल्यामुळे मग थोडं चुकल्या चुकल्यासारखं होतं, पण शेवटी सिनेमा ट्रॅकवर येतो, इथे कौशलच्या संगीताची आणि आदर्श शिंदेच्या आवाजाची कामगिरी महत्त्वाची ठरते. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर एक जर रन करत नसेल तर तेव्हा दुसरा उभा राहतो आणि धावफलक हलता ठेवतो, असं सांगता येईल..

परफॉर्मन्स

Ranga+Patanga+Movieअभिनयाच्या बाबतीत सर्वांनीच जबरदस्त बॅटिंग केलीये. पण मॅन ऑफ द मॅच आहे मकरंद अनासपुरे… मकरंद म्हणजे कॉमेडी हे प्रेक्षकांना आठवणारही नाही इतकं मनापासून काम मकरंदने केलंय. दिग्दर्शकाला जे हवंय ते अगदी आतून त्याने सादर केलंय. नंदिता धुरीने मकरंदला छान साथ दिलेली आहे. संदीप पाठक आणि टीव्ही पत्रकाराची शाब्दिक जुगलबंदीसुद्धा अफलातून आहे. छोट्या छोट्या भूमिकेमध्येही भारत गणेशपुरे, उमेश जगताप, सुहास पळशीकर असे अभिनेत्यांची निवड हा विचारही महत्त्वाचा आहे.

रेटिंग 100 पैकी 75


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close