प्रत्युषाची आत्महत्या की हत्या, 15 दिवसांनी उकलणार गूढ ?

April 2, 2016 9:37 PM0 commentsViews:

मुंबई – 02 एप्रिल : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येचा तपासाला आता नवं वळण लागलंय. तिच्या निकटवर्तीयांनी संशय व्यक्त केलाय की प्रत्युषाची हत्या करण्यात आलीये. तिचा प्रियकर राहुल राज सिंग याचीही या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केलीये. तिचा मृत्यू गळफासामुळेच झाला असावा, असा अंदाज पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलाय. तर दुसरीकडे प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यास आणखी 15 दिवस लागणार आहे.प्रत्युषाचा विसेरा, नखं, केसाचे नमुने आणि डीएनए नमुने घेऊन ते फोरेंसिक लॅबला पाठवले आहे. तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? पाहूया हा रिपोर्ट..

pratyusha-banerjee (3)बालिका वधू या लोकप्रिय मालिकेतून ती घराघरात पोहोचली..लहान वयातच लग्न झालेल्या आनंदीची तिने भूमिका तिने खूबीने केली. पण खर्‍या आयुष्यात मात्र ती आनंदीही नव्हती आणि लग्नही तिला हुलकावणी देत होतं. तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग हा तिला त्रास देत होता आणि लग्न पुढे पुढे ढकलत होता असा आरोप तिच्या निकटवर्तीयांनी केलाय. त्यानंतर पोलिसांनी राहुलची चौकशीही केली.

शुक्रवारी दुपारी 4 वाजता राहुलनेच प्रत्युषाला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि पोलिसांनाही कळवलं होतं. तिला हॉस्पिटलमध्ये आणल्या मृत घोषित करण्यात आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलंय की, गळफासामुळे तिचा मृत्यू झाला असावा. तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याबद्दल अजूनपर्यंत पोलिसांनी स्पष्टपणे काहीही म्हटलं नाहीये. राहुलशी पैशांवरून भांडण झाल्यानंतरच प्रत्युषानं हे टोकाचं पाऊल उचललं, असा अंदाज व्यक्त होतोय. पण माझ्या मुलावर संशय घेणं चुकीचं आहे, असं राहुलच्या आईने म्हटलंय.

pratyusha-banerjee (13)प्रत्युषाच्या वैयक्तिक आयुष्यात प्रॉब्लेम्स सुरू असताना तिच्या करिअरमध्येही अडचणी होत्या. बालिका वधू या तिच्या पहिल्या सीरियलमधून तिला काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर तिने डझनभर शोजमध्ये छोटी-मोठी कामं केली. बिग बॉसमध्ये ती अनेक वेळा रडली होती. एका चॅनलवर पॉवर कपल शोमध्ये प्रत्युषाने बॉयफ्रेंड राहुलसोबत काम केलं होतं. त्या शोचे पैसे तिने त्याला न सांगता काढून घेतले. यावरून या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता.

जमशेदपूरमधून आलेल्या या गोड चेहर्‍याच्या अभिनेत्रीचा वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी अंत झाला. हा अंत टीव्ही क्षेत्रात असलेल्या प्रंचड ताणतणावामुळे झाला? की जीवघेण्या स्पर्धेमुळे झाला? की रिलेशनशिपमधल्या खटक्यांमुळे झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांना शोधावी लागतील.

15 दिवसांनंतर उकलणार गूढ

दरम्यान, प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यास आणखी 15 दिवस लागणार आहे. प्रत्युषाच्या गळ्यावर इजा झाली ती मात्र नेमकी इजा काय आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होणार आहे. प्रत्युषाचा विसेरा, नखं, केसाचे नमुने आणि डीएनए नमुने घेऊन ते फोरेंसिक लॅबला पाठवले आहे. आतापर्यंत 7 लोकांचा जबाब नोंदवण्यात आलाय.

जबाबात  राहुल राज सिंग, प्रत्युषाचे वडील आणि जवळच्या मित्रांचा समावेश आहे. प्रत्युषाच्या आत्महत्यामागे प्रॉपर्टीचा वाद होता हे स्पष्ट नाही. राहुलने तिचा आणि प्रत्युषामध्ये नेमका काय वाद झाला होता याची माहिती पोलिसांना दिली नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांच्या घरातले व्यक्ति त्यांच्या लग्नासाठी तयार होते. त्यामुळे प्रत्युषाने आत्महत्या केली हत्या केली याचं गुढ वाढलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close