देवनार डेपोवर सेंद्रीय कचरा टाकणे थांबवा, केंद्राची पालिकेला शिफारस

April 4, 2016 4:27 PM0 commentsViews:

मुंबई – 04 एप्रिल : देवनार कचरा डेपो आग प्रकरणी केंद्र सरकारच्या अहवालात महापालिकेवर ताशेरे ओढण्यात आलेत. या अहवालात मुंबई महापालिकेवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आलाय. कचर्‍याचं सेंद्रीय, सुका, घरगुती कचरा, ई-कचरा असं वर्गीकरण करणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत वर्गीकरण होत नाही तोपर्यंत सेंद्रीय कचरा न टाकण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांचं पालन करण्याची महापालिकेला सूचना करण्यात आली आहे.devnar33

देवनार कचरा डेपोमध्ये वारंवार लागलेल्या आगीमुळे केंद्राच्या टीमने अलीकडे डेपोची पाहणी केली होती. या पाहणी पथकाने आपला अहवाल सादर केलाय. केंद्र सरकारच्या या अहवालात देवनारच्या कचरा व्यवस्थापनात गलथानपणा केल्याबद्दल मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. देवनार कचरा डेपोवर 20 ते 30 मीटर उंचीचे कचरा ढीग आहेत. या कचर्‍याचे जोपर्यंत सेंद्रीय, सुका, घरगुती आणि धोकादायक ई कचर्‍यासारखा कचरा असं वर्गीकरण करुन वेगळा केला जात नाही तोपर्यंत सेंद्रीय कचरा इथं टाकू नका अशी शिफारस केलीय.

कचरा वेचकांना कचरा डेपोत जाण्यापासून प्रतिबंध करण्यापेक्षा कचरा वर्गीकरणात त्यांना सामावून घेऊन कचरा कचरा डेपोवर जाण्याला अटकाव करा असंही सांगितलंय. सेंद्रीय कचर्‍यापासून निघणारा मिथेन गॅस जमा करण्याची शिफारस करण्यात आलीय.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं 22 मार्चला दिलेल्या निर्देशांचं पालन करा अशी पालिकेला सूचना केलीय. ज्यात प्रक्रीया विभाग तयार होईपर्यंत घनकचरा व्यवस्थापनाचे काही तत्काळ उपाय करा, सध्या अस्तित्वात असलेले कचरा डेपो वैज्ञानिक पद्धतीने बंद करा, सेंद्रीय कचर्‍याचे विकेंद्रीकरण करण्याच्या सूचना दिल्यात.

केंद्राच्या अहवालात ताशेरे

- देवनारच्या कचरा व्यवस्थापनात हलगर्जी केल्याबद्दल पालिकेवर ताशेरे
- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांचं पालन करा
- प्रक्रीया केंद्र तयार होईपर्यंत घनकचरा व्यवस्थापनाचे तात्काळ उपाय करा
- सध्या अस्तित्वात असलेले कचरा डेपो वैज्ञानिक पद्धतीने बंद करा
- सेंद्रीय कचर्‍याचे विकेंद्रीकरण पद्धतीनं वर्गीकरण करा
- देवनार कचरा डेपोवर सेंद्रीय कचरा टाकणं तातडीनं थांबवण्याची शिफारस
- वर्गीकरण होत नाही, तोपर्यंत सेंद्रीय कचरा न टाकण्याची शिफारस
- सेंद्रीय कचर्‍यापासून निघणारा मिथेन गॅस जमा करण्याची शिफारस


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close