‘भारत माता की जय’पेक्षा दुष्काळावर लक्ष्य द्या -शरद पवार

April 4, 2016 9:01 PM0 commentsViews:

सोलापूर – 04 एप्रिल : खुर्ची गेली तरी चालेल पण भारत माता की जय म्हणणारच असं म्हणणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्लावजा टोला लगावलाय. भारत माता की जय अशा भावनिक मुद्यापेक्षा देशातल्या दुष्काळाच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारांनी लक्ष घालावं असा सल्ला रशरद पवार यांनी दिलाय. ते सोलापूरमध्ये बोलत होते.pawar_on_cm3

भारत माता की जय म्हणणारच असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या वादात उडी घेतली होती. आपल्या विधानावर ठाम राहत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर भारत माता की जय वादाचं राजकारण केलं जात आहे असा आरोप करत खुर्ची गेली तरी भारत माता की जय म्हणणारच असा पवित्रा घेतला. त्याचा शरद पवारांनी आपल्या शैलीत समाचार घेत दुष्काळावर लक्ष्य देण्याचा सल्ला पवारांनी दिलाय.

दुष्काळ-पाणी आणि जनावरांचा चारा हे मूलभूत प्रश्न आहेत. त्या प्रश्नांबाबत केंद्र आणि राज्य शासनाचं दुर्लक्ष होतेय. पण येत्या आठवड्यात या प्रश्नांवर सरकारला निर्णय घेण्यासाठी सक्ती करू असा सूचक इशारा शरद पवारांनी दिलाय. शरद पवार हे आज सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यात मकाई साखर कारखाना कार्यकस्थळावर दिंगबरराव बागल यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी राष्ट्रीय तसंच राज्याच्या प्रश्नावर वक्तव्य केलं. सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्यांनी आगामी काळात सरकारविरोधात रान उठवण्याचा सूचक इशाराच पवारांनी यावेळी दिला.

‘भारत माता की जय’ म्हणायला कुणी सांगायची काय गरज आहे. सगळेच जण भारत माता की जय म्हणतोय आणि आता भारत माता की जय किती वेळी म्हणावं?, कुणी म्हणावं अशी काही गाईडलाईन्स नाहीये. किंवा राज्य घटनेतही असं काही लिहिलं नाहीये. मुळात अशा भावनिक मुद्यापेक्षा देशातल्या दुष्काळाच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारांनी लक्ष घालावं असा सल्लाही पवार यांनी दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close