वरळी विश्रामगृहात फुकट्यांचा सुळसुळाट, महसूल बुडवणार्‍यांची होणार हकालपट्टी

April 4, 2016 9:26 PM0 commentsViews:

उदय जाधव, मुंबई – 04 एप्रिल : सर्वसामान्य नागरिकांकडून कोणताही महसूल बुडाला तर सरकार त्यांच्याकडून व्याजासहित त्याची वसुली करतं. पण सरकारी विश्रामगृहात दोन दोन वर्ष फुकट राहणार्‍या राजकीय कार्यकर्त्यांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करतंय. मुंबईत वरळी इथल्या सरकारी विश्रामगृहात वर्षभर फुकट राहून महसुल बुडवणार्‍यांचा पर्दाफाश आयबीएन लोकमतनं केलाय. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बातमीची दखल घेत या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहे .

varli_343मुंबईत प्राईम लोकेशनवर असलेलं हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं विश्रामगृह. इथं राहणार्‍यांना सात दिवसांहून अधिक काळ राहायचं असेल तर भाडं भरावं लागतं. पण, याच विश्रामगृहात फुकटे भाडोत्री आहेत. जे गेली वर्ष दोन वर्ष इथं ठाण मांडून आहेत. या फुकट्या भाडोत्रींनी बुडवलेल्या महसुलाची कागदपत्र आयबीएन लोकमतला मिळाली आहेत.

 वरळी विश्रामगृहात राहणारे फुकटे भाडोत्री कोण आहेत ?

1) कांतीकुमार जैन, आरपीआयचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष
बुडवलेला महसूल 2 लाख 58 हजार 100 रुपये.
2) अनिता जैन, कांतीकुमार यांची पत्नी
बुडवलेला महसूल 78 हजार 700 रुपये
3) प्रशांत कागदे
बुडवलेला महसूल 4 लाख 61 हजार 200 रुपये
4) संजय झाडे-पाटील
बुडवलेला महसूल 4 लाख 55 हजार 200 रुपये
5) गजेंद्र कुरेकर
बुडवलेला महसूल 1 लाख 78 हजार 700 रुपये
6) प्रमोद पाटील
बुडवलेला महसूल 1 लाख 26 हजार 700 रुपये

वरळी विश्रामगृहात फुकट राहणार्‍या कांतीकुमार जैन यांनी तर, विश्रामगृह परिसरातच अनधिकृत बांधकाम केल्याचंही समोर आलंय.
आयबीएन लोकमतने या विश्रामगृहात जाऊन, फुकट राहणार्‍या भाडोत्रींना विचारण्याचा प्रयत्नही केला. पण हे सर्व फुकटे भाडोत्री रूमला टाळा लावून पसार झाले होते. नागरिकांकडून बुडालेला महसूल व्याजासकट वसूल करणारे सरकार या राजकीय आश्रय मिळवणार्‍या फुकट्या भाडोत्रींकडून महसूल वसूल करणार का असा सवाल उपस्थित झाला.

आयबीएन लोकमतच्या या बातमीनंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. फुकटात राहणार्‍यांची हकालपट्टी करणार आणि त्यांच्याकडून दंडही वसूल करणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसे आदेशच त्यांनी दिले आहेत. तसंच गेस्ट हाऊसमध्ये झालेलं अनाधिकृत बांधकाम पाडणार असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close