मुंबईकरांची प्रतीक्षा संपली, एसी लोकल मुंबईत दाखल!

April 5, 2016 9:38 AM0 commentsViews:

मुंबई – 05 एप्रिल : मुंबईकरांची बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित असणारी एसी लोकल अखेर मुंबईत दाखल झाली आहे. सध्या या लोकलचा मुक्काम कुर्ला कारशेडमध्ये आहे. या लोकलच्या चाचणीला 16 एप्रिलपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. घामाच्या धारांनी हैराण होणार्‍या मुंबईकरांना लवकरच गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे.

भारतीय रेल्वेची सुरुवात 16 एप्रिल 1853 रोजी मध्य रेल्वेमधूनच झाली. हा ऐतिहासिक दिवस लक्षात घेता 16 एप्रिलचा मुहूर्त एसी लोकलच्या चाचणीसाठी निवडण्यात आला आहे.

सुरुवातीला पश्चिम रेल्वेवर ही एसी लोकल धावणार होती. मात्र, त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने अचानक ट्रान्सहार्बर मार्गावर ही लोकल चालवण्याची घोषणा केली. लोकलमधील आवश्यक कामे पूर्ण केल्यानंतर सुरक्षिततेसंदर्भात चाचण्या होणार आहे. त्यासाठी सुमारे तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. बारा डब्यांच्या लोकलमध्ये सहा डब्यांचे दोन भाग करण्यात आले आहेत. त्यात, एक्स्प्रेसप्रमाणे एका डब्यातून दुसर्‍या डब्यात प्रवेश करता येईल, अशी रचना केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close