मनसेच्या मेळाव्याला परवानगी दिलीच कशी ? – हायकोर्ट

April 5, 2016 7:15 PM0 commentsViews:

mns_dasra_melawa3मुंबई – 05 एप्रिल : मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळावा प्रमाणेचं मनसेनंही येत्या गुढीपाडव्याला मेळावा घेण्याचं आयोजन केलंय. पण, आता या मेळाव्यावर कोर्टाची टांगती तलवार आहे. शिवाजी पार्क हा सायलन्स झोन भाग आहे. अशा भागात लाऊडस्पीकर लावता येत नाही. मग, मेळाव्याला परवानगी दिलीच कशी, असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या 10 व्या वर्धापन दिनी शिवाजी पार्कवर मेळावा घेणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला टक्कर देण्यासाठी मनसे मैदानात उतरल्याची चर्चा रंगलीये. पण, या मेळाव्याविरोधात वेकॉम संघटनेनं
जनहीत याचिका दाखल केलीये. याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली.

ध्वनीप्रदूषणाच्या नियम 6 उपकलम 5 नुसार सायलन्स झोनमध्ये लाऊडस्पीकर लावता येत नाही. मग, मेळाव्याला परवानगी दिलीच कशी, असा सवाल मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय.

त्याचबरोबर मेळाव्यात ध्वनीप्रदूषण होणार नाही, याचं प्रतिज्ञापत्र आयोजक देणार का ? अशीही विचारणाही हायकोर्टाने केली आहे. 8 एप्रिल रोजी म्हणजे येत्या शुक्रवारी शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा होणार आहे. राज ठाकरे या मेळाव्यात भाषण करणार आहेत. पण, आता हायकोर्टाच्या सवालामुळे मेळाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close