जिवंत शेतकर्‍याला मयत दाखवून सावकाराने लाटली जमीन !

April 5, 2016 10:23 PM0 commentsViews:

 औरंगाबाद – 05 एप्रिल : मराठवाड्यातला शेतकरी दुष्काळामुळे पुरता उद्‌ध्वस्त झालाय. तो सुलतानी आणि अस्मानी संकटाचा सामना करतोय. सरकारने कर्ज माफ करूनही खाजगी सावकारांच्या छळातून त्याची सुटका झालेली नाही. औरंगाबादमध्ये तर शेतकर्‍याच्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी सावकारानं अधिकार्‍यांना हाताशी धरलं आणि जिवंत शेतकर्‍याला मयत दाखवून त्याची जमीन हडप केली.abad_farmar3

बबनराव तुपे औरंगाबाद जिल्ह्यातल्या आडगाव बुद्रुकचे अल्पभूधारक शेतकरी. हे आमच्या कॅमेर्‍यासमोर जिवंत आहेत पण सहकार खात्यानं त्यांची नोंद चक्क मयत अशी केलीय. सहकार खात्याच्या उपनिबंधकांनी बबनराव तुपेंना मृत जाहीर केलं. आणि यामागे आहे एका सावकाराचं कारस्थान. गावातले सावकार विष्णू केदारे यांनी सहकार खात्याला हाताशी धरून बबन तुपेंना मृत दाखवलं आणि त्यांच्या एक एकर जमिनीवर ताबा घेतला.

बबन तुपे यांनी विष्णू केदारे यांच्याकडे आपली शेती गहाण ठेवून त्यांच्याकडून कर्ज घेतलं. बबनराव तुपेंनी हे कर्ज व्याजासहित फेडलंसुद्धा पण गहाण शेती परत करायचं सोडून सावकाराने एक एकर शेती स्वत:च्या नावावर करून घेतली.

बबनराव तुपे यांना तीन मुली आहेत. एका मुलीचं लग्न येत्या 16 एप्रिलला होतंय. आता त्यांच्याकडे केवळ एक एकर शेती आहे आणि तीही कोरडवाहू. सावकारानं लाटलेली शेती परत मिळाली नाही तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू असा इशारा देण्याची वेळ त्यांच्यावर आलीय.

शेतीसाठी कर्ज घ्यायचं तर शेतकर्‍यांना खाजगी सावकारांशिवाय पर्याय नाही. याचाच फायदा हे सावकार घेतायत. शेतकरी कर्ज मागायला आली की खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाखमोलाची शेती कवडीमोलाने घेण्याचा सपाटा सावकारांनी लावलाय. अशा सावकारांवर कारवाईही होत नाहीये. त्यामुळे शेतकरी मात्र पिचला जातोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close