शिवतीर्थावर घुमणार मनसेचा आवाज, मेळाव्याला कोर्टाची सशर्त परवानगी

April 6, 2016 4:11 PM0 commentsViews:

raj_thackeryमुंबई – 06 एप्रिल : शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर मनसेचा आवाज घुमणार की नाही असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. पण, आता
मनसेच्या या मेळाव्याला मुंबई हायकोर्टाने हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ चौफेर धडाडणार आहे.

शिवाजी पार्कवर आतापर्यंत शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या थाटामाटात साजरा होत आलाय. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर मेळावा घेण्याची घोषणा केली. पण, या मेळाव्याविरोधात वेकॉम संघटनेनं मुंबई हायकोर्टात जनहीत याचिका दाखल केली होती. सायलन्स झोन असलेल्या या भागात मेळाव्याला परवानगी दिलीच कशी ? असा सवाल कोर्टाने राज्य सरकारला विचारला होता.

आज पुन्हा या याचिकेवर सुनावणी झाली आणि कोर्टाने या मेळाव्याला सशर्त परवानगी दिली. मात्र, आवाजाची मर्यादा पाळा असे आदेश कोर्टातर्फे मनसेला देण्यात आले आहेत. आवाजाची मर्यादा पाळण्याबाबत सरकारनं लक्ष ठेवावं यासंदर्भात 15 एप्रिलला कोर्टात अहवाल सादर करावा असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

याचिकर्त्यांनी मुंबई पालिका आणि राज्य सरकारने दिलेल्या परवानगीला आव्हान दिले नव्हते हा मुद्दाही हायकोर्टाने लक्षात घेतला. या कार्यक्रमात लाऊडस्पीकर नाही तर साउंड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम वापरली जाणार आहे आणि साउंड बॅरिअर सिस्टीमही वापरली जाणार आहे अशी माहिती मनसेच्या वतीने कोर्टात दिली.

शिवाजी पार्क सायलेन्स झोन आहे की नाही याबद्दल मनसेने कोर्टात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होते. आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणार नाही. आम्ही तसं प्रतिज्ञापत्र पालिकेला दिलं आहे. पण शिवाजी पार्क सायलेन्स झोन आहे की नाही निश्चित झाले पाहिजे, असंही मनसेच्या वतीनं विचारण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close