‘भारत माता की जय’ने दुष्काळ हटणार नाही, ‘सामना’तून मुख्यमंत्र्यांवर निशाना

April 7, 2016 8:43 AM0 commentsViews:

uddhav_on_cm

मुंबई – 07 एप्रिल : राज्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात दुष्काळाने उग्र स्वरुप धारण केले असताना, फक्त ‘भारतमाता की जय’ बोलून दुष्काळाची दाहकता कमी होणार नाही, असा खोचक टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील आजच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. पाण्याच्या टाक्या आणि टँकरवर पोलिसांचे पहारे बसविण्यात आले असून पाण्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला हे चित्र धक्कादायक आहे, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘भारतमाता की जय’ बोलावेच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसं जिवंत राहायला हवीत. हा भारतमातेच्या स्वप्नातील महाराष्ट्र नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खुर्चीवर बसावं आणि महाराष्ट्राला पाणी द्या, असे खडे बोल सेनेकडून फडणवीसांना सुनाविण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात पाण्यासाठी दंगली, मारामार्‍या सुरू झाल्याचं चित्र अस्वस्थ करणारं आहे. सध्या भारतमाता की जयचे राजकारण जोरात सुरू आहे. खुर्ची गेली तरी चालेल, पण भारतमाता की जय बोलणारच असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं आहे, हे छानच झाले, पण भारतमातेची लेकरे पाण्यासाठी वणवण भटकत आहेत, तडफडत आहेत, पाण्यासाठी एकमेकांचे रक्त पिण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, घरात पिण्याचे पाणी देईन नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी गर्जना केली असती तर ते अधिक बरं झालं असतं, अशी खोचक टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close