विलासराव देशमुख 8 वर्षं मुख्यमंत्री राहिले तरीही लातूरला पाणीटंचाई -खडसे

April 7, 2016 6:40 PM1 commentViews:

07 एप्रिल : ज्या लातूर शहराची आज पाण्याअभावी बिकट अवस्था आहे त्याच लातूर शहराचे काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख हे राज्याचे 8 वर्षं मुख्यमंत्री राहिले. आणि आज त्यांच्याच लातूरची आजची अवस्था पाहिली जात नाही अशी टीकाच राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. तसंच मांजरा साखर कारखान्याला योग्य प्रमाणात पाणी पुरवण्यात आलं जर हे झालं नसतं तर लातूरला पाणीटंचाई झाली नसती असा आरोपही खडसेंनी केला. खडसेंच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी संताप व्यक्त केला असून खडसेंनी माफी मागावी अशी मागणी केलीये.khadse_latur

आज विधानसभेत लातूरच्या पाणीप्रश्नावरुन काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले. त्यावर एकनाथ खडसे यांनी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा उल्लेख केल्याने एकच खळबळ उडाली. लातूरमध्ये पाण्याची परिस्थिती भीषण असून उद्योगधंदे स्थलातंरीत होत आहे. दुकानं बंद पडत आहे. दुष्काळामुळे उद्योगधंदे बंद पडत आहे अशा उद्योजकांचे व्याज सरकार माफ करणार का ? यानंतर उद्योगांना पाणी कसं पुरवलं जाणार ? आणि टँकरचे दर जे पूर्वी 600 लिटरसाठी 200 रुपये होते ते आता 1200 रुपयांपर्यंत पोहचले आहे. हे दर रोखण्यासाठी राज्य सरकार काय पावलं उचलणार असा सवाल अमित देशमुख यांनी एकनाथ खडसेंना विचारला होता.

यावर खडसे म्हणाले, खरं पाहण्यास गेलं तर पाण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. त्यामुळे पाण्याचे टँकर हे सहा हजारांचे द्यायचे की 10 हजारांचे द्यायचे ही पूर्णत: 100 टक्के जबाबदारी लातूर महापालिकेची आहे. त्यांची जबाबदारी आहे म्हणून सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही असा टोलाच खडसेंनी लगावला.

ज्या लातूर शहराचे काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख हे 8 वर्षं मुख्यमंत्री राहिले त्या शहराची अशी अवस्था पाहून मला दु:ख होतंय. परंतु, जे झालं ते झालं पाणी देणे गरजेच आहे. पण, मांजरा साखर कारखानाला संपूर्ण पाणी देण्यात आलं जर मांजरा साखर कारखान्याला पाणी दिलं नसतं तर लातूरला पाण्याचा समस्या भेडसावली नसती अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.

खडसेंच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेत तीव्र संताप व्यक्त केला. दुष्काळ हा संपूर्ण मराठवाड्यात असून तो निसर्ग निर्मित आहे. राज्य सरकार मदत पुरवण्यात अपयशी झालंय म्हणून आपले अपयश झाकण्यासाठी हेतुपुरस्कृत आरोप केले जात आहे अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर जर भाषण करण्याची हौस असेल तर तशी सुविधा करू असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • shiva

    are kay geun basala aahe

close