शनि चौथर्‍यावरील महिला प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा

April 8, 2016 2:50 PM0 commentsViews:

shani_mandir_bhumata
मुंबई – 08 एप्रिल : शनिशिंगणापूर इथल्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाण्यापासून कोणालाही रोखणार नाही. सर्वांना प्रवेश देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतला आहे. या निर्णयाचे संपूर्ण राज्यात स्वागत करण्यात येत असून, यापुढे पुरुष किंवा महिला असा भेदभाव न करता कोणलाही शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन अभिषेक करता येणार आहे. विश्वस्त समितीच्या अध्यक्ष अनिता शेटे आणि इतर सर्व विश्वस्तांनी एकमताने हा निर्णय घेतला.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिशिंगणापूरमध्ये आज वेगळं नाट्य घडलं. गुढीपाडव्याच्या निमित्तानं गावकर्‍यांनी शनीच्या चौथर्‍यावर जाऊन गंगापूजन केलं. गावकर्‍यांचा याला विरोध होता. मात्र, तो डावलून कावडीधारक गावकर्‍यांनी चौथर्‍यावर गंगाजलाचा अभिषेक केला. यावरून आधी गावकरी आणि विश्वस्तांमध्ये मतभेद होते. मात्र, या घटनेनंतर काही वेळातच आम्ही कोणालाही चौथर्‍यावर जायला अडवणार नाही असं विश्वस्तांनी जाहीर केलं. त्यामुळे आता महिलांना चौथर्‍यावर जाऊन शनीची पूजा करता येणार आहे.

गेल्या शनिवारी शनिशिंगणापूरमध्ये मोठा गोंधळ उडाला. शनी चौथऱयावर जाऊ पाहणार्‍या तृप्ती देसाई आणि इतर महिलांना धक्काबुक्की करण्यात आली होती. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी सुरक्षेमध्ये तृप्ती देसाई यांना घटनास्थळावरून बाजूला नेलं होतं. त्यावर, भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची अडवणूक केली जाणार नाही. त्या आल्या तरी त्यांनाही चौथर्‍यावर प्रवेश देऊ, असं विश्वस्तांनी सांगितले.

दरम्यान, विश्वस्तांच्या निर्णयामुळे स्त्री-पुरुष समानता येईल, असं मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं आहे. शनिचौथर्‍यावरील प्रवेशाबद्दल आनंद आहे. पण कायद्याचं पालन होत नाही. देवस्थानने नाराजीने निर्णय घेतला आहे, असं याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ म्हणाल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close