IPL चे सामने राज्याबाहेर खेळवले तरी चालतील,पण पाणी देणार नाही -मुख्यमंत्री

April 8, 2016 6:38 PM0 commentsViews:

cm_fadanvisमुंबई -08 एप्रिल : आयपीएलच्या सामन्यांसाठी पिण्याचं पाणी देणार नाही. सामने राज्याबाहेर खेळवले तरी चालतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते गिरगावामध्ये बोलत होते.

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी केली जात आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवावे अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलीये. कोर्टाने आयपीएलच्या पहिल्या मॅचला परवानगी दिली आहे. पण,राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना आयपीएलला पाणी कुठून देणार आहात, असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला केलाय.

येत्या 12 एप्रिलला याबाबत राज्य सरकारला कोर्टात भूमिका मांडायची त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएलला पिण्याचं पाणी देणार नाही अशी ठाम भूमिका घेतलीये. राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असतांना पाण्याची नासाडी केली जाणार नाही अशी आम्ही आम्ही कोर्टात ठाम भूमिका घेतली होती. यापुढे आयपीएलला पिण्याचं पाणी देणार नाही. वाटलं तर आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवले तरी चालतील अशी कडक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close