केरळमध्ये अग्नितांडव, मृतांची संख्या 102 वर

April 10, 2016 1:59 PM0 commentsViews:

केरळ – 10 एप्रिल : केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील पुत्तिंगल मंदिरात भीषण अग्नितांडव घडलंय. या दुर्घटनेत आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू झाला, तर 280 जण जखमी आहेत. यातले अनेक जण गंभीर जखमी आहेत. त्यांना हेलिकॉप्टरनं शहरात हलवण्यात येणार आहे. जखमींना त्रिवेंद्रम वैद्यकीय विद्यालय आणि कोल्लमच्या जिल्हा साधारण रुग्णालयात नेण्यात येतंय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.kerala_fire

पुत्तिंगल मंदिरात दरवर्षीप्रमाणे मध्यरात्रीपासून फटाके फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता. ही आतषबाजी पाहण्यासाठी हजारो नागरिक जमले होते. फटाक्यांमुळे मंदिराच्या एका भागाला आग लागली आणि सर्वात मोठं दुदैर्व असं की आग फटाके साठवलेल्या खोलीत पसरली. यामुळे शेकडो फटाक्यांचा एकाच वेळी स्फोट होऊ लागला आणि बघता बघता आगीनं अक्राळविक्राळ रुप धारण केलं.

जमलेले सर्वच जण वेळेत सुरक्षित स्थळी जाऊ शकले नाहीत, आणि यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची आणि जखमींची संख्या वाढली. केरळ भाजपनं न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. त्यावर केरळच्या मुख्यमंत्री उम्मेन चँडी यांनी उत्तर दिलंय. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊ, असं उम्मेन चँडी यांनी स्पष्ट केलं.

उम्मेन चंडी यांनी कोल्लमला जाऊन घटनास्थळी भेट दिली. तिथे त्यांनी घटनेबाबत विचारपूस केली, आणि स्थानिकांचं म्हणणंही ऐकून घेतलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळला निघाले आहेत. त्यांच्यासोबत एम्स, राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आणि सफदरजंग हॉस्पिटलमधले 15 डॉक्टर्स आणि वैद्यकीय पथकंही आहेत. या पथकामध्ये बर्न स्पेशलिस्ट्सचाही समावेश आहे.

तसंच भाजप अध्यक्ष अमित शहा प्रचारासाठी केरळमध्येच होते. त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करून त्रिवेंद्रममध्ये जखमींची भेट घेतली. दरम्यान, केरळ काँग्रेसचे बडे नेते ए. के. अँटनी यांनी यात राजकारण न आणण्याचं आवाहन केलंय.

सचिन तेंडुलकरनंही या दुर्घटनेबद्दल दुख व्यक्त केलंय. “कोल्लमच्या दुःखद बातमीनं मी हादरून गेलो. ज्यांचं या आगीत नुकसान झालं, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. ह्या संकटाला सामोरं जाण्यासाठी देव आपल्याला शक्ती देवो.” अशी भावना सचिनने ट्विटरवर व्यक्त केली.

फटाके फोडण्याबाबतचे नियम काय आहेत?

– फटाके फोडण्याची जागा आणि फटाके साठवण्याचं ठिकाण यात किमान 100 मीटरचं अंतर हवं. हा नियम पाळला गेला नाही.
– जिथे फटाके पेटवले जातायेत, तिथे लोकांना उभं राहण्यास मनाई असते. लोकांनी दुरून बघणं अपेक्षित असतं. ह्या नियमाचंही उल्लंघन केलं गेलं.
– फटाके ज्या ठिकाणी साठवले जातात, तिथे सुरक्षिततेचे विशेष उपाय करावे लागतात. असा एकही उपाय इथे नव्हता.
– एवढ्या मोठ्या प्रमाणावर फटाके फोडताना अग्निशमन दलाला पूर्वकल्पना दिलेली बरी असते. तसं कीहीही इथे केलेलं नव्हतं.
– अशीही माहिती मिळतेय की गेले अनेक दिवस फटाके फोडले जातायेत. स्थानिकांनी याबाबत तक्रारही केली होती. पण ना पोलिसांनी काही कारवाई केली, ना मंदिर संस्थानाची याची दखल घेऊन फटाके फोडण्याचं प्रमाण कमी केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close