दिलदार बळीराजा, पिकांची परवा न करता शेतातील पाणी पुरवले गावाला !

April 11, 2016 10:29 AM0 commentsViews:

akola_faramarअकोला – 11 एप्रिल : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. हंडाभर पाण्यासाठी लोक वणवण भटकतायेत, मात्र अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील खेर्डा खुर्द गावाचे चित्र निराळे आहे. दिवसातून दोनदा गावात पाणी मिळते. गावातील महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत नाही. हे शक्य झालंय याच गावातील शेतकरी गोवर्धन सदांशीव याच्यामुळे.

सदांशीव यांनी यावर्षी आपल्या चार एकर शेतात गव्हाचे पिक न घेता शेतातील विहिरीचे पाणी गावकर्‍यांसाठी मोफत खुले केलंय. पाण्याची पातळी खोल गेल्याने गावातील विहिरींनी तळ गाठला असून, हातपंपामधूनही पाणी काढण्यासाठी कसरत करावी लागते.

अशात एका अल्पभूधारक शेतकर्‍याने दुष्काळी परिस्थितही पिकाची चिंता न करता, गावकर्‍यांसाठी शेतातील पाणी खुले करून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केलाय. सदांशीव यांनी गावाबाहेरील शेतामधून गावात पाणी आण्यासाठी 210 स्प्रिंकलर पाईपांचा वापर केलाय. यात 130 पाईप स्वतःच्या मालकीचे आणि इतर पाईपसाठी गावकर्‍यांची मदत घेऊन, गावापर्यंत पाणी पोहोचवलंय.

पाण्याची पातळी पाहता उन्हाळाभर गावकर्‍यांना पाणी पुरावे म्हणून, बँकेचे कर्ज घेऊन विहिरीचे खोलीकरण करण्याच्या सदांशीव यांचा मानस आहे.

दुष्काळ आणि त्यावर होणार राजकारण हे नवीन नाही, मात्र गोवर्धन सदांशीव सारख्या अल्पभूधारक शेतकर्‍याचा आदर्श घेतला तर काही प्रमाणत का होईना दुष्काळावर मात करणे शक्य होऊ शकेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा