अलमपूरमध्ये गेल्या 25 वर्षांपासून आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुकीला विरोध

April 11, 2016 4:01 PM0 commentsViews:

बुलडाणा – 11 एप्रिल : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी शतकोत्तर जयंती साजरी केली ज़ात आहे. यासाठी भाजप सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा असे शासकीय परिपत्रकच काढले आहे. मात्र, बुलडाण्यातील अलमपूरमध्ये सरपंचाने आंबेडकर जयंती साजरी करू नका असा तोंडी फतवाच काढल्यामुळे आंबेडकरी जनतेवर पुन्हा एकदा अन्याय केला आहे.

amalpur3एकीकडे देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या शतकोत्तर महोत्सव साजरा करण्याचे केंद्र शासनाचे धोरण असताना दुसरीकडे जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे गेल्या 25 वर्षांपासून आंबेडकर जयंतीला कडाडून विरोध करीत असल्याचं चित्र स्पष्ट दिसले आहे. आंबेडकरी जनतेची संख्या अल्प असल्याने आणि सवर्णांची संख्या चारपट असल्याने सातत्याने आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीला विरोध होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा भरवली जाते. त्यात सवर्णांची संख्या जास्त असल्याने बहुमताने विरोध होत आलाय. त्याचाच आधार घेत पोलीस देखिल सरळ परवानगी नाकारत आहे.

ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली त्याद्वारे देश चालतो त्यांच्याच जयंतीला विरोध होत आहे. ही बाब निषेधार्थ असल्याचे मत आंबेडकरी नेत्यांनी व्यक्त केलंय. या घटनेच्या संपूर्ण जिल्ह्यातून निषेध नोंदवला जात आहे. जिल्ह्यातील मलकापूर मतदार संघात येत असलेले अलमपुर गाव आणि त्या मतदारसंघाचे भाजपचे आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती यानी घेतलेलं आमदार दत्तक गाव आहे.

असं असताना सुद्धा अलमपूर येथील इतर समाजाचे लोक डॉ.आंबेडकर यांच्याच जयंती महोत्सवाला सातत्याने विरोध करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

डॉ आंबेडकर जयंती महोत्सवाला यावर्षी तरी पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी ही मागणी अलमपूर गावातील आंबेडकरी जनता करीत आहे. पण ती मागणी आता पोलिसांनी देखील नाकारली आहे. जर मिरवणूक काढाल तर गुन्हे दाखल करू अशी नोटीस बजावली आहे.

मिरवणूक काढू द्यावी या मागणीसाठी दलित संघटना एकवट्याल्या असून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे रितसर परवानगी मागितली आहे. जर परवानगी मिळाली नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा संघटनांनी दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा