अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यातही आता महिलांना प्रवेश

April 11, 2016 8:54 PM0 commentsViews:

kolhapur mahalaxmi4

कोल्हापूर– 11 एप्रिल :  साडे तीन शक्तीपीठापैकी एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या आंबाबाई मंदिरातल्या गाभार्‍यातही महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर काही महिलांनी प्रातिनिधिक स्वरुपात गाभार्‍यात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गाभार्‍यापर्यंत जाऊन देवीचे दर्शन घ्यायला याआधी महिलांना बंदी होती. केवळ राजघराण्यातील महिलांना आणि पुजारांच्या पत्नींनाच गाभार्‍यापर्यंत जाण्याची परवानगी होती. मात्र, सोमवारी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता सर्वसामान्य महिला भाविकदेखील देवीच्या गाभार्‍यात जाऊन दर्शन घेऊ शकतील.

कोल्हापूर आणि राज्यभरातील पुरोगामी संघटना आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने नंतर राजवाडा पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. .न्यायालयाचा आदेश असल्यामुळं गाभारा प्रवेशाचा वाद नको अशी भुमिका मांडत पोलीस निरक्षक अनिल देशमुख यांनी या बैठकीत तोडगा काढला. मात्र, हिंदुत्ववादी संघटना अजूनही विरोधाच्या भूमिकेत आहेत. त्यानंतर काही महिलांनी पूजेचे सामान घेऊन थेट गाभार्‍यात जाऊन देवीचे दर्शन घेतलं. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही या निर्णयाचे स्वागत केलं आहे. तसंच 13 तारखेला मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, कोल्हापूरमधील अवनी संस्थेच्या महिला आंदोलकांनी गेल्या आठवड्यात गाभाऱयातच प्रवेशाची मागणी करत तसा प्रयत्न केला. या वेळी अन्य महिला भाविक, कर्मचा-यांनी त्यांना जोरदार विरोध करत त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर मंदिराच्या गाभार्‍यातील महिलांच्या प्रवेशाचा विषय ऐरणीवर आला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा