आयपीएल राज्याबाहेर नेण्याचा विचार करा, कोर्टाचा बीसीसीआयला सल्ला

April 12, 2016 9:06 PM0 commentsViews:

12 एप्रिल : आयपीएलसाठीचं पाणी दुष्काळग्रस्त भागाला देणार का ?, आयपीएलच्या एका सामन्यासाठी किती पाणी वापरले जाते ? असा सवाल मुंबई हायकोर्टाने बीसीसीआयला विचारला. तसंच आयपीएलचे सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचा विचार करा असा सल्लाही हायकोर्टाने बीसीसीआयला दिलाय.

mumbai_court_iplआयपीएल पाणी वापरासंदर्भातल्या याचिकेवर आज पुन्हा एकदा हायकोर्टात सुनावणी झाली. एक लिटरही पिण्याचे पाणी आयपीएलसाठी वापरण्यात आल्यास आयपीएलला राज्यात परवानगी देणार नाही अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने कोर्टात मांडण्यात आली.

तर मुंबई आणि पुण्यातल्या आयपीएल मॅचसाठी सांडपाण्याचा वापर केला जाईल. आयपीएल सामन्यांच्या वेळी रॉयल वेस्टर्न इंडियन टर्फ क्लब अर्थात महालक्ष्मी रेसकोर्सच्या पुर्नवापर केलेल्या सांडपाण्याचा आम्ही पुर्नवापर करू असं आज बीसीसीआयनं हायकोर्टात स्पष्ट केलं. नागपूरमध्ये होणार्‍या तीन मॅचेस पंजाबमध्ये खेळवल्या जाऊ शकतात. याबाबत सर्व टीम मालकांचं मत जाणून घ्यायची सूचना कोर्टाने बीसीसीआयला केली आहे.

यावर न्यायाधीशांनी आयपीएल सामने पुण्याच्या बाहेर हलवणं शक्य आहे का, अशी विचारणा बीसीसीआयला केली आहे. तसंच आयपीएलसाठीचं पाणी दुष्काळग्रस्त भागाला देणार का? आणि आयपीएलच्या एका सामन्यासाठी किती पाणी वापरले जाते? अशी विचारणाही कोर्टाने बीसीसीआयला केली. यावर बीसीसीआयच्या वतीने कोणतही उत्तर देण्यात आलं नाही. कोर्टाने बीसीसीआयला उद्यापर्यंत उत्तर देण्याची मुभा दिली असून याबाबतची पुढची सुनावणी उद्या होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा