मुलीच्या कन्यादानाआधीच कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

April 14, 2016 9:40 AM0 commentsViews:

suicide img14 एप्रिल : अकोल्यात एका शेतमजुराने मुलीच्या लग्नाच्या एक आठवडा आधीच आर्थिक विवंचनेतून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. शेषराव ठोसरे असं या शेतमजुराचं नाव आहे.कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचललंय.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्याच्या धारेल येथील शेतमजूर शेषराव ठोसरे यांच्या मुलीचे लग्न आठ-दहा दिवसांवर आले होते. त्यासाठी मंडपापासून किरणा आणि इंधनाचीही सोय केली. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नाही, अशा स्थितीत लग्नाचे कर्ज कसे फेडावे, या चिंतेतून शेषराव ठोसरे यांनी मुलीच्या कन्यादानाच्या आधीच पेटवून घेऊन आत्महत्या केली.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याच्या रामगाव येथील मुलाशी 16 एप्रिलला ठोसरे यांची मुलगी लक्ष्मीचं लग्न करण्याचं ठरलं. शेती नसल्याने हात मजुरीवरच ठोसरे यांनी मुलीच्या लग्नासाठी पै-पै जमा केलेल्या पैश्यात मुलीचे साक्षगंध केलं. लग्नासाठी लागणार्‍या लाकूड फाट्यासह इतरही वस्तूंची जुळवा-जुळव शेषरावची सुरू होती. दरम्यान, लग्नासाठी आचारी आणि मंडप सांगून त्यांना अँडव्हान्स म्हणून थोडीफार रक्कम देण्याचं आश्‍वासन दिलं.

या रक्कमेची जुळवाजुळव करण्यासाठी ठोसरे यांनी दोन-तीन दिवस पायपीट केली.मात्र, शेतमजुरीवर जे काही कमावले ते अपुरेच, लग्नाचा दिवस जस-जसा जवळ येत होता. तस-तसे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या पित्याला मुलीचे लग्न कसे होणार, लग्नाला आवश्यक इतर साहित्याची जुळवा-जुळव कशी होईल, याचीच चिंता होती. लक्ष्मी नंतर दुसर्‍याही मुलीचे शिक्षण आणि लग्न. हे विचारचक्र शेषरावच्या मनात फिरत होते. याच तणावातच 9 एप्रिलला शेषरावने अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटवून घेतलं. यात ते 80 टक्के भाजल्या गेलं, जिल्हा सर्वोचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची जीवन यात्रा संपली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा