अंबाबाई मंदिराच्या आवरात तृप्ती देसाईंना मारहाण, हाॅस्पिटलमध्ये केलं दाखल

April 14, 2016 11:25 AM0 commentsViews:

trupti-desai_कोल्हापूर – 14 एप्रिल : मोठ्या विरोधानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी अखेर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन दर्शन घेतलं. पण, दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर भाविकांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्या अंगावर शाईफेकण्याचा प्रयत्न झाला. मारहाणीमुळे तृप्ती देसाई काही काळ बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे.

शनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर तृप्ती देसाई अंबाबाईच्या मंदिरात जाऊन प्रवेश घेण्यासाठी कोल्हापूरकडे कूच केली. कोल्हापूरात ताराराणी चौकात मोर्चा काढला जाणार होता. पण त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. ताराराणी चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे परिसराला छावणीचं स्वरुप आलं होतं. मंदिरातही शांतता समिती आणि हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. साडी घालूनच भूमाता ब्रिगेडला गाभार्‍यात सोडणार असा पवित्रा त्यांनी घेतला होता. पोलिसांनी आधी तृप्ती देसाईंना ताब्यात घेतलं. त्यानंतर संरक्षण देऊन त्यांना मंदिराच्या गाभार्‍या दर्शन घेण्यासाठी नेण्यात आलं. मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन तृप्ती देसाईने दर्शन घेतलं. दर्शन घेऊन परतल्यानंतर उपस्थिती भाविक आणि हिदूत्वादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी तृप्ती देसाईंना धक्काबुक्की आणि मारहाणही केली. या मुळे तृप्ती देसाई तिथे बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा