संघ म्हणजे संसद नाही, मोदी म्हणजे देश नाही – कन्हैय्या कुमार

April 14, 2016 8:11 PM0 commentsViews:

479115-kanhaiya-kumar

14 एप्रिल :  ‘नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे संसद नाही’, असं म्हणत जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने पंतप्रधानांसह आरएसएसवर हल्ला चढवला. तसंच, मोदीभक्ती आणि देशभक्ती यातील फरक कळला पाहिजे, असंही त्याने विरोध करणार्‍यांना सुनावलं.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंतीनिमित्त नागपूरच्या पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ केला. एवढचं नाही तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कन्हैयाच्या दिशेने चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या 15-20 कार्यकर्तयांना ताब्यात घेतलं.

आम्हाला देशापासून नव्हे तर देशात स्वातंत्र्य हवे, असा पुनर्रुच्चार कन्हैय्याने केला. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेमुळेच नागरिकांना विरोध करण्याचा अधिकार मिळाला. आता कोणी दगड मारून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही. केवळ घोषणा देऊन देश चालत नाही. त्यासाठी दृष्टिकोन असावा लागतो आणि कपडे बदलल्याने दृष्टिकोन बदलत नाही. 50 वर्षे ज्यांनी आपल्या मुख्यालयावर तिरंगा फडकावला नाही. ते काय आम्हाला देशभक्ती शिकवत आहेत, असंही कन्हैया कुमार म्हणाला. 56 इंची छाती असलेल्या एखाद्याचा पराभव करण्यासाठी 18 इंच छातीच्या अनेकांनी एकत्र यायला हवं’, असं आवाहन कन्हैया कुमारने केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा