साईड बर्थमुळे नाही तर उंदरांमुळे ट्रेन एक तास रखडवली – हेमंत पाटील

April 14, 2016 9:03 PM0 commentsViews:

14 एप्रिल : शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी मनासारखी जागा मिळाली नाही म्हणून तासभर ट्रेन रखडवली नाही, तर ट्रेनमध्ये उंदीर फिरत होते, अस्वस्छता होती म्हणून ट्रेन रखडवल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

नांदेडचे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी रेल्वेमध्ये साईड बर्थ मिळाला म्हणून सीएसटी स्टेशनवर गोंधळ घातला. एवढंच नाही तर त्यांनी सिकंदराबाद-देवगिरी एक्स्प्रेस तब्बल एक तास रखडवून ठेवली होती.

मात्र साईड बर्थ मिळाल्यामुळे नाही तर रेल्वेमध्ये घाण होती, बर्थमध्ये उंदिर फिरत होते, असंही हेमंत पाटील यांनी सांगितलं आहे. सीएसटी स्टेशनवरच्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये जेव्हा मी ट्रेनमध्ये चढलो, तेव्हा तिथे उंदिर आणि अस्वच्छता होती. त्यामुळे सर्व आमदारांचा संताप अनावर झाला आणि ट्रेन थांबवली असं हेमंत पाटील म्हणाले. शिवाय मोबाईलमध्ये याचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचेही पाटलांनी सांगितले आहे.

बुधवारी राज्य विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर मुंबईबाहेरील आमदारांची मतदारसंघात जाण्यासाठी लगबग सुरु होती. जवळपास 40 आमदार कार्यकर्त्यांसह सिकंदराबाद-देवगिरी एक्सप्रेसमधून निघाले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. मात्र या सगळ्या गोंधळात सीएसटी स्टेशनवरुन 9.10 मिनिटांनी निघणारी देवगिरी एक्स्प्रेस 10.06 मिनिटांनी सुटली. यामुळे ट्रेनमधील सुमारे 2000 ते 3000 प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा