पालघर जिल्ह्यातल्या मोखाडामध्ये डोंगर पोखरून उभी राहतेय टाऊनशिप

April 15, 2016 4:20 PM0 commentsViews:

पालघर – 15 एप्रिल :  आदिवासींची जमीन हडपून त्या जागेवर बेकायदेशीररित्या टाऊनशिप उभारण्याचं काम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्यात डोंगर पोखरून तिथं बंगले बांधले जात आहेत. सूर्यमाळ या ठिकाणी हा सगळा प्रकार सुरू आहे.

MokhadaBanner
तानसा वन्यजीव अभयारण्यात येणारी जमीन, जी बिगरशेती (एनए) नाहीय, त्या जमिनीचे खोटे सात-बाराचे दाखले बनवून बिल्डरांच्या घशात घातले आहेत. यासाठी अख्खाच्या अख्खा डोंगर पोखरला गेला असून हे सगळा प्रकार माजी तहसीलदार सीतीराम जाधव यांच्या सहमतीने केला असल्याचा आरोप तिथल्या आदिवासींनी केला आहे. ही जमीन आमची आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

बिल्डरांनी फक्त जमिनी हडपल्याच नाहीत, तर तिथे बंगले बांधण्याचं कामही जोरात सुरू आहे. हे प्रकरण इथेच संपत नाही, सध्याचे तहसीलदार आणि इतर प्रशासकीय अधिकार्‍यांना हा सगळा प्रकार माहिती आहे. त्यातले काही जण तर इथे पार्टीही करून जातात. पण प्रश्न विचारले तर मात्र उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. या सगळ्यात नुकसान फक्त आदिवासींचं होत नाहीये, तर पर्यावरणाचीही मोठी हानी होतेय. बंगले बांधण्यासाठी अनेक झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा