आमदार रवी राणा यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा राडा

April 15, 2016 5:48 PM0 commentsViews:

अमरावती – 15 एप्रिल :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीदिनी अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आंबेडकरांचा पुतळा उभारला. या पुतळयावरून आमदार रवी राणा आणि अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यातील वाद चिघळला असून राणा यांच्या कार्यालयाची आज (शुक्रवारी) सकाळी तोडफोड करण्यात आली आहे. ही तोडफोड भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसंच जोपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हटणार नसल्याचं सांगत रवी राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

Ravi Rana213

रवी राणा यांनी अमरावतीमधील भीम टेकडीवर उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. परवानगी नाकारल्यानंतरही रवी राणा यांनी बुधवारी रात्री या पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. पोटे यांच्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली, असा आरोप करत पोटे यांच्या कानाखाली लगावेल, अशी धमकीही रवी राणा यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे पालकमंत्री पोटे आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद चिघळणार, असे स्पष्ट संकेत मिळत होते. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी आज (शुक्रवारी) सकाळी राजा पेठ भागातील रवि राणा यांच्या कार्यालयात घुसून तिथे तोडफोड केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्या आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा