स्वतंत्र विदर्भासाठी जेलभरो

March 23, 2010 8:45 AM0 commentsViews: 18

23 मार्चवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भात ठिकठिकाणी विदर्भ राज्य संग्राम समितीच्या नेत्यांनी जेलभरो आंदोलन केले. नागपूरमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. खासदार विलास मुत्तेमवार आणि प्रकाश आंबेडकर यांनी धरणे आंदोलन केले. वर्धा आणि बुलडाणा इथेही आंदोलन झाले. वर्ध्यात खासदार दत्ता मेघे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. रास्ता रोको करणार्‍या दत्ता मेघे, माजी खासदार सुरेश वाघमारे, शेतकरी नेत्या सरोज काशीकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बुलडाणा जिल्ह्यातून 250 जणांना ताब्यात घेण्यात आले. तर यवतमाळ शहरात 400 कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. वर्ध्यातही 100 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. गोंदिया शहरातून 150 तर तिरोडा इथून 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली. नागपुरात आतापर्यंत 5 हजार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. चंद्रपुरात दीड हजार कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली.बंदला प्रतिसाद वर्ध्यात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या व्यापारी बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. वर्धा जिल्ह्यात मेडिकल वगळता सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. बजाज चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी खासदार दत्ता मेघे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच 2 ऑक्टोबरपासून स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणाही दत्ता मेघे यांनी केली. पक्षाने कारवाई केली तरी वेगळ्या विदर्भाची मागणी सोडणार नाही, असा निर्धारही मेघेंनी व्यक्त केला.विधानभवनासमोर आंदोलन वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाच्या गेटजवळ आंदोलन केले. या आंदोलनात देवेंद्र फडणवीस, नाना पटोळे, सुधीर मुनगुंटीवार, योगेश सागर, प्रमोद जठार, पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, प्रकाश शेट्टी सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीकाखासदार विलास मुत्तेमवार यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री दगाबाज असल्याचा आरोप मुत्तेमवार यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री विदर्भद्रोही असल्याचेही त्यांनी म्हटले.

close