कुडाळमध्ये नारायण राणेंनी राखला गड, नगरपंचायतीमध्ये काँग्रेसकडे सत्ता

April 18, 2016 1:42 PM0 commentsViews:

senior-congress-leader-narayan-rane-addresses-a-press-conference-after-resigning-02

कुडाळ – 18 एप्रिल :  कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेला धूळ चारत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. एकूण 17 जागा असलेल्या या नगरपंचायतीमध्ये 9 जागांवर नारायण राणेंच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसने विजय मिळवत सत्ता काबीज केली. दुसरीकडे शिवसेनेला अवघ्या 6 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. तर भाजप आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे.

या निवडणुकीत डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी चांगलंच वजन खर्ची घातलं होतं. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. त्यावेळी कुडाळ शहरामध्ये वैभव नाईक यांना चांगली आघाडी मिळाली होती. त्यामुळे पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकीत काय होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर मतदारांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांच्याच बाजूने कौल दिला असून, काँग्रेसकडे सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.

युती न झाल्याचा फायदा काँग्रेसला झाला आणि फटका भाजप-सेनेला बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला लढण्यासाठी केवळ दोनच जागा दिल्या होत्या. त्या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत. तर शिवसेना आणि भाजपने स्वबळावर ही निवडणूक लढवली होती. कुडाळ शहर हे राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे शहर मानले जाते. त्यामुळे आजी-माजी आमदारांनी नव्याने स्थापन झालेल्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली. नारायण राणे स्वत: जरी या निवडणुकीत खूप सक्रिय नव्हते तरी त्यांनी कार्यकर्त्यांची फौज मात्र कामाला लावली होती. काँग्रेसच्या या विजयामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा