दुष्काळी भागातील पंकजा मुंडेंचा सेल्फी वादाच्या भोवर्‍यात

April 18, 2016 3:32 PM0 commentsViews:

Pankaja Munde

लातूर – 18  एप्रिल :  अनेकदा वादात अडकणार्‍या पंकजा मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पाहणी दौर्‍यावेळी काढलेल्या सेल्फींमुळे राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे गोत्यात आल्या आहेत. पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हे सेल्फी पोस्ट केले असून त्यावर रिट्विटद्वारे अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पंकजा मुंडे या लातूरच्या पालकमंत्री आहेत. रविवारी त्यांनी दुष्काळामुळे कोरडेठाक पडलेल्या मांजरा नदीपात्रातील गाळ उपसा कामाची पाहणी केली. त्यानंतर काही बंधार्‍यांच्या कामांचीही पाहणी त्यांनी केली. यादरम्यान, त्यांना सेल्फीचा मोह मात्र आवरला नाही. मांजरा नदीपात्राच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले अनेक सेल्फी काढले. अधिकार्‍यांसोबतही त्यांनी सेल्फी काढले.

विशेष म्हणजे हे सेल्फी त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केलं आणि तिथेच त्यांची पंचाईत झाली. दुष्काळग्रस्त लातूरकर पाण्यासाठी तडफडत असताना ज्या मंत्र्यांकडे ‘पालक’ म्हणून लोक आशेने पाहत आहेत त्यांनीच अशी असंवेदनशीलता दाखवावी, याला काय म्हणावे? असा सवाल करत पंकजा यांच्याविरोधात सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

भाजपचा सत्तेतील मित्रपक्ष शिवसेनेनेही पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. दुष्काळग्रस्त भागात जाऊन राज्य सरकारमधील एक मंत्री सेल्फी टिपतो ही बाब दुदझ्वी आहे. अशाप्रसंगी सेल्फीचा मोह टाळायला हवा, अशा शब्दांत शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी नाराजी व्यक्त केली तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही पंकजांवर टीका करणारं ट्विट केलं आहे. पंकजा मुंडेंनी जखमेवर मीठ चोळायचं काम केलंय. आधी बिअर कंपन्यांना पाठिंबा दिला, आणि आता सेल्फी काढला. आता पुढे काय करणार आहात?, असं त्यांनी म्हटलं आहे. तर सोशल मीडियावर सामान्य लोकांकडूनही पंकजांवर टीकेची झोड उठली आहे. दुष्काळ असताना पंकजा असे फोटो कसे काढू शकतात. किंवा पंकजांचा या फोटोंसाठी सत्कारच केला पाहिजे, अशी उपहासात्मक टीकाही त्यांच्यावर होतं.

दरम्यान, सेल्फीवरुन वादात सापडवलेल्या, पंकजा मुंडे यांनी आजच्या कॅबिनेटलाही दांडी मारल्याची चर्चा आहे. वैद्यकीय कारणामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही असं कारण जरी पंकडा मुंडेंनी दिलं असलं तरी त्यांच्या अनुपस्थिती मागे सेल्फी वाद असल्याच बोललंल जातं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा