‘पाच लाखांत घर’ देण्याची योजना सापडली वादात, चौकशीचे आदेश

April 18, 2016 7:02 PM0 commentsViews:

Housing Scam

18 एप्रिल :   पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेचा वापर करून फक्त 5 लाखांत 1 बीएचके घर देण्याचा दावा करणार्‍या ‘आपलं घर’ या योजनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसंच याबाबतचा लवकरच अहवाल सादर करावा, असा आदेशही त्यांनी दिला आहे. या योजनेबाबत करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून शहराच्या सभोवताली 5 लाखांत घर देण्याची योजना सुरू केल्याची जाहिरात प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे फोटो टाकून पंतप्रधान आवास योजनेमध्ये दहा हजार घरं देण्यात येणार असल्याची मोठी जाहिरात या ग्रुप कडून जाहिरातीत सांगण्यात आलं होतं. या योजनेला सर्वसामान्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 10 हजार लोकांनी नोंदणी केली आहे.

आपलं घर या योजनेशी सरकारचा काहीही संबंध नसल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमवारीच दिली होती. 5 लाखांत आपलं घर या योजनेवर आक्षेप घेत भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी या योजनेद्वारे लाभार्थी इच्छुकांकडून विकासक पैसे उकळत असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी विविध प्रलोभने आणि आश्वासने दिली जात असून, या योजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सोमैया यांनी केली होती.

खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या योजनेची चौकशी करण्याची मागणी करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना या प्रकरणाची माहिती घेण्याचे आदेश दिले. यानंतर प्रकाश मेहतांनी मॅपल ग्रुपतर्फे आपलं घर प्रस्तुत महाराष्ट्र हाऊसिंग डे योजनेशी केंद्र किंवा राज्य सरकारचा काहीही संबंध नाही. पंतप्रधान आवास योजनेतही याचा समावेश नाही असं स्पष्टीकरण दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा