मुंबई-पुणे संघांचा 1 मेचा सामना पुण्यातच, हायकोर्टाची मान्यता

April 20, 2016 1:49 PM0 commentsViews:

343739-ipl-logo-8

मुंबई – 20 एप्रिल : आयपीएलच्या ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ या टीमदरम्यान 1 मे रोजी होणारा सामना पुण्यामध्येच खेळू देण्याची बीसीसीआयची मागणी मुंबई हाय कोर्टाने मंजूर केली आहे. त्यामुळे हा सामना आता पुण्यातच गहुंजे इथल्या मैदानावर होणार हे निश्चित झालं आहे.

सध्या राज्य दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करत आहे. त्यामुळे पाण्याची उधळपट्टी थांबवण्यासाठी ‘आयपीएल’ सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश देण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली होती. कोर्टानेही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तसंच परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत 30 एप्रिलनंतरचे सामने राज्याबाहेर हलवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला बीसीसीआय आणि आयपीएलच्या कुठल्याही टीमने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेले नाही. उलट सामने इतरत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू केली. पुण्याने 30 एप्रिलनंतरचे सामने विशाखापट्टण्म इथे हलवले आहेत. मात्र, 29 एप्रिल रोजी पुण्यात ‘सुपरजायंट्स पुणे’ आणि ‘गुजरात लायन’ यांच्यादरम्यान सामना होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 1 मे रोजी पुण्यातील मैदानावरच ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्यामुळे दोन दिवसांत सामना हलवण्यासाठीची व्यवस्था करणं अशक्य आहे, असा दावा करत 1 मे रोजीचा सामना पुण्यातच खेळू द्यावा, अशी विनंती हायकोर्टाकडे करण्यात आली होती. ती कोर्टाने मान्य केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा