भाजप आमदाराच्या मारहाणीत जखमी झालेल्या शक्तिमान घोड्याचा मृत्यू

April 20, 2016 7:14 PM0 commentsViews:

देहरादून – 20 एप्रिल : उत्तराखंडमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान भाजपचे आमदार गणेश जोशींच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या शक्तिमान घोड्याचा अखेर मृत्यू झालाय. या लाठी हल्ल्यात शक्तिमान घोड्याला पाय गमवावा लागला होता. त्यावर डॉक्टरांनी शर्थीने प्रयत्न केले पण अखेर आज या घोड्याचा मृत्यू झालाय.

shaktiman444मागील महिन्यात 14 मार्च रोजी देहरादूनमध्ये भाजपच्या आंदोलनादरम्यान भाजपचे आमदार गणेश जोशी यांनी पोलिसांच्या शक्तिमान घोड्यावर जोरदार लाठीहल्ला केला होता. हा लाठीहल्ला इतका भयंकर होता की, शक्तिमान घोड्याचा पाय निकामी झाला. या प्रकरणी गणेश जोशींना अटक करण्यात आली होती. आणि त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. दरम्यान, मुंबई आणि पुण्यातील तज्ञ डॉक्टरांनी शक्तिमानला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. एवढंच नाहीतर अमेरिकेतील तज्ञ डॉक्टरांची टीमही बोलवण्यात आली. जखमी शक्तिमान घोड्याचा पाय कापून त्या जागी कृत्रिम पाय बसवण्यात आला होता.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली शक्तिमानवर उपचार सुरू होते. शक्तिमानचं वजन हे 400 किलो पर्यंत होतं. त्यामुळे त्याचा भार कृत्रिम पायावर पडत होता. पाय कापल्यावर घोडा जिवंत राहण्याची शक्यता फक्त 2 टक्के असते. याचं कारण घोडा कधीच जमिनीवर आडवा होत नाही, तो झोपतोही उभ्याउभ्याच.. त्यामुळेच शक्तिमान वाचावा यासाठी प्रयत्न सुरू होते. मध्यंतरी शक्तिमाननेही उपचाराला साथ दिली होती. तो उभाही राहिला. पण, अखेर शक्तिमानाचा मृत्यू झाला. पायाला झालेल्या जखमेमुळे संसर्ग झाल्यामुळे शक्तिमानचा मृत्यू झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. पोस्टमार्टेम रिपोर्टनंतर शक्तीमानच्या मृत्यूचं कारण समजू शकेल.

दरम्यान,शक्तिमानला योग्य उपचार दिले नाही. त्याला विनाकारण उभं राहण्यास भाग पाडलं असा आरोपच भाजपचे आमदार अजय भट यांनी केलाय. आता या प्रकरणी भाजपचे आमदार गणेश जोशींवर काही कारवाई होते का हे पाहावं लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा