जगाची तहान भागणार काशी?

April 22, 2016 1:54 PM0 commentsViews:

अजय कौटिकवार, मुंबई

22  एप्रिल :  मराठवाडा, बुंदेलखंड यासारख्या भागात कमालीचा दुष्काळ आहे. लातूरला रेल्वेनं पाणी नेण्याइतकी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. पण दुष्काळ आणि पाणीटंचाईची ही समस्या फक्त भारतापुरती मर्यादित नाही. जगभरातल्या अमेरिका, ब्राझीलसारख्या समृद्ध देशांनाही दुष्काळाला सामोरे जावं लागतं आहे. त्यातच जगभरातले पाण्याचे साठेही आटत चालले आहेत.

8631842649_fa314c86ca

जगाला भेडसावणारा सर्वात महत्वाचा प्रश्न कुठला? असा प्रश्न विचारला तर त्याचं सध्याचं उत्तर आहे. दहशतवाद… मात्र येत्या काही वर्षात पाणी आणि त्याचं व्यवस्थापन हा सर्वात महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न असेल अशा इशारा संयुक्त राष्ट्रानं दिला आहे. झपाट्यानं होणारा पर्यावरणाचा र्‍हास, प्रचंड प्रमाणावर होणारं प्रदुषण आणि पाण्याचा बेसुमार उपसा यामुळं स्वच्छ पाण्याचे सर्वच स्त्रोत धोक्यात आले आहेत.

पाण्याची अशीच उधळपट्टी होत राहिली तर येत्या 30 वर्षांमध्ये 60 टक्के भूजलाचे स्रोत कोरडे पडतील किंवा धोकादायक अवस्थेत असतील, अशी भीती जागतिक बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली. जगातल्या अनेक मोठ्या नद्यांचे प्रवाह प्रदूषित झालेत किंवा आटले आहेत. त्याचा जगातल्या 400 कोटी लोकांना फटका बसतोय.

जगातली पाण्याची स्थिती

- पृथ्वीवरील केवळ अडीच टक्केच पाणी पिण्यायोग्य आहे.
– 73 टक्के साठा हा बर्फाच्या स्वरूपात तर तलाव, नद्या आणि झर्‍यांमध्ये 20 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
– जगाच्या लोकसंख्येच्या 11 टक्के लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध नाही.
– भारतात 5 हजार 723 पाण्याचे ब्लॉक्स आहेत त्यापैकी 29 टक्के साठे धोकादायक स्थितीत आहेत.

पाण्याच्या अतिवापरामुळे जगात सिंचनाखाली असलेल्या जमिनीपैकी 10 टक्के जमीन खारवटून गेली आहे. त्याचा 100 पेक्षा जास्त देशांना फटका बसलाय. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगापुढं असणार्‍या 28 संकटाची यादी केली त्यात पाण्याचा 8 व्या क्रमांक आहे. याच प्रश्नावर जगात अनेक देशांमध्ये वादही होत आहेत. त्यामुळं या प्रश्नाकडे लक्षं दिलं नाही तर भविष्यातल्या युध्दाचं कारण हे पाणी असेल असा इशारा जगभरातले तज्ञ देत आहेत.

अमेरिकेमधल्या कॅलिफोनिर्यातच्या समृद्ध प्रदेशापासून ते सर्व विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये सध्या दुष्काळाचं भीषण संकट निर्माण झाले आहेत जागतिक तापमानात होणार्‍या बदलामुळं सर्वच देशांचं ऋतूचक्रही बिघडले. निसर्गाचा हा धोक्याचा इशारा असला तरी शहाणं व्हायला अजून कुणीच तयार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा