बोल बजरंग बली की जय, संगमनेरमध्ये महिलाच ओढता हनुमान रथ !

April 22, 2016 5:50 PM0 commentsViews:

संगमनेर – 22 एप्रिल : एकीकडे महिला देवाच्या दर्शनाला जाण्यासाठी लढत असताना संगमनेर इथं मात्र अनेक दशकांपासून हनुमान रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातोय. हनुमान जयंतीच्या दिवशी निघणार्‍या रथाला ओढण्यासाठी शेकडो रणरागिणी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.sangamner

महिला-पुरूष समानतेचा नारा संगमनेरमध्ये अनेक दशकांपासून दिलेला दिसतो. ब्रिटीश काळात 1929 साली हनुमान जयंतीच्या दिवशी पुरूषांनी काढलेली रथ मिरवणूक इंग्रज पोलिसांनी अडवली आणि पुरूषांना तुरूंगात डांबलं. त्यामुळे या रथाच्या मिरवणुकीला बंदी घालण्यात आली. हनुमानाचा निघालेला हा रथ दहा दिवस तसाच उभा होता. ह्या रथाची मिरवणूक काढायचीच हा निर्धार येथील झुंबरबाई अवसक या महिलेने केला आणि इतर महिलांना जमवुन इंग्रज पोलिसांना न जुमानता महिलांनी या रथाला ओढत गावभर मिरवणूक काढली. तीच प्रथा आजही मोठ्या उत्साहाने जपली जातेय.

विशेष म्हणजे ज्या इंग्रज पोलिसांनी या रथ मिरवणूकीला विरोध केला होता त्यांनीच नंतर माघार घेत हनुमान जयंतीच्या दिवशी या रथाला त्यांच्याकडून भगवा झेंडा लावून रथ मिरवणुकीला परवानगी दिली इंग्रज गेले. मात्र, आजही पोलिसांकडून वाजत गाजत झेंडा या ठिकाणी आणला जातो आणि पोलिसांच्या हस्ते पूजन झाल्यावर रथ ओढला जातो आम्हाला या उत्सवात सहभागी झाल्याने मोठा आनंद होतं असल्याचं डीवायएसपी अजय देवरे यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रात अनेक मारूती मंदिरातही महिलांना जाण्यास मनाई असताना संगमनेरात मात्र, हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघणारा रथ महिला ओढत असतानाचे हे चित्र बघितल्यावर इतरांनीही अंधश्रद्धा बाजूला ठेवून प्रत्येक ठिकाणी महिलांना समान अधिकार द्यायलाच हवा असं म्हणावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा