मुंबईत कन्हैया कुमारवर हल्ला; गळा दाबण्याचा केला प्रयत्न

April 24, 2016 12:34 PM0 commentsViews:

kanhaiya-kumar-759

24 एप्रिल :  मुंबईहून पुण्याला जाताना मुंबई विमानतळावर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर आज (रविवारी) मुंबईत हल्ला करण्यात आला असून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. कन्हैयावरील हल्लेप्रकरणी विमातळ सुरक्षा अधिकार्‍यांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याचं कळतं. आपल्यावरील हल्ल्याची माहिती कन्हैयाने ट्विटरवरून दिली आहे.

मुंबईतील शनिवारची सभा झाल्यानंतर आज सकाळी 10च्या सुमारास कन्हैया मुंबईहून पुण्याला निघाला असताना मुंबई विमानतळावरच मानस नावाच्या व्यक्तीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कन्हैयासोबत असलेल्या त्याच्या सहकार्‍यांनी त्याला हल्लेखोराच्या ताब्यातून सोडवलं, मात्र त्यानं पुन्हा कन्हैयावर हल्ला करायचा प्रयत्न केला. कन्हैया आणि त्याच्या साहकार्‍यांनी या संदर्भात सुरक्षा अधिकार्‍यांकडे तक्रार केली. त्यानंतर या दोघांनाही विमानातून खाली उतरवण्यात आलं.

दरम्यान, या हल्ल्यात कन्हैया कुमारला दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं असून त्या अज्ञात व्यक्तीची चौकशी सुरू असल्याचं कळतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा