कल्याण डोंबिवलीतील बांधकाम बंदी हायकोर्टाने उठवली

April 25, 2016 9:25 PM0 commentsViews:

underconstruction

25 एप्रिल : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बांधकामांना बांधकामांवर घालण्यात आलेली बंदी अखेर (आज) सोमवारी मुंबई हायकोर्टाने उठवली. शहरातील कचरा विल्हेवाटासंबंधी प्रशासन ठोस निर्णय घेत नसल्याने वर्षभरापूर्वी हायकोर्टाने कल्याण डोंबिवलीत नवीन बांधकामांना बंदी घातली होती. महापालिका हद्दीत घालण्यात आलेल्या बांधकाम बंदीमुळे मागच्या वर्षभरात शहरातील सर्व नवीन बांधकाम प्रकल्प ठप्प पडले होते. मात्र, हायकोर्टाने आज बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याने बांधकाम क्षेत्रावर आलेली मरगळ दूर होण्याची शक्यता आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड नसल्याने शहरातील बांधकामांवर बंदी लादण्यात आली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत डम्पिंग ग्राऊंडच्या प्रश्नावर समाधानकारक पावलं उचलल्याचं केडीएमसीने प्रतिज्ञापत्रात मांडल्याने हायकोर्टाने बंदी उठवण्याचा निर्णय दिला. मात्र, आगामी काळात कचर्‍याच्या विल्हेवाटासंदर्भात नियमांची पूर्तता झाली नाही किंवा आवश्यक ती पावलं उचलली जात नसल्याचं दिसून आल्यास बांधकाम बंदी पुन्हा लागू करण्यात येईल, असंही कोर्टा ठणकावलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा