10 लाख रुपये दिले नाही म्हणून संदीप सावंतचा हा बनाव -निलेश राणे

April 26, 2016 3:56 PM0 commentsViews:

मुंबई – 26 एप्रिल : संदीप सावंतने माझ्याकडून 10 लाख रुपये मागितले होते ते दिले नाही त्याचा राग मनात धरून त्याने हा बनाव केला असा दावा काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय. तसंच संदीप सावंत हा भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात होता. त्यांनीच हे माझ्याविरोधात कट रचला असा आरोपही राणे यांनी केली.nilesh rane

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण केल्याच्या प्रकरणामुळे माजी खासदार निलेश राणे अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात ठाणे पोलिसांमध्ये अपहरण, घरात घुसून मारणे, दंगल माजवणे असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. निलेश राणे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थित राहिलो नाही म्हणून त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. मात्र, निलेश राणेंनी संदीप सावंत यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. संदीप सावंत हा काँग्रेसचा चिपळूणचा तालुकाध्यक्ष असून तो 12 वर्षांपासून माझ्यासोबत आहे. तो माझ्या घरचाच एक माणूस आहे. त्याच्यावर 10 लाखांचे कर्ज आहे. त्याने माझ्याकडे तशी मागणी केली होती. पण एवढी रक्कम मी त्याला देऊ शकलो नाही त्याचा राग धरून त्याने हा बनाव केला असा दावा राणेंनी केला. तसंच मध्यंतरी तो भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात होता.आम्ही अलीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा हाती घेऊन मेळावा घेतला. या मेळाव्याबद्दल तो चुकीच्या बातम्या पसरवतं होता. सेना आणि भाजपच्या नेत्यांनी त्याला सोबत घेऊन हा सगळा कट रचला. मराठा आरक्षणाचा मुद्दा थांबवण्यासाठी हे कारस्थान आहे असा आरोपही राणे यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा