दुष्काळामुळे लोकं 2 लग्न करताय,बसपा खासदाराने तोडले अकलेचे तारे

April 27, 2016 6:07 PM0 commentsViews:

दिल्ली – 27 एप्रिल : हंडाभर पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतं आहे. देशभरातून सेलिब्रिटी, दिग्गज दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत आहे. पण, याला बसपाचे खासदार राजपाल सिंह अपवाद ठरले आहे. दुष्काळामुळे लोकं दोन लग्न करत आहे असा जावईशोधच आमदार महोदयांनी लावलाय. त्यांच्या विधानामुळे राज्यातील खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये.

bsp_rajpan_singh3आज राज्यसभेत दुष्काळाच्या मुद्यावर चर्चा सुरू असतांना बसपाचे खासदार राजपाल सिंह यांनी अकलेचे तारे तोडले. मराठवाड्यात पाणी टंचाई भीषण आहे. लोकांना प्यायला पाणी नाहीये. पण, माझ्या असं वाचण्यात आलंय की, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त या दुष्काळामुळे दोन लग्न करता. एक पत्नी मुलांना सांभाळते आणि दुसरी पत्नी ही पाणी आण्यासाठी जाते असं बेजाबदार वक्तव्य राजपाल सिंह यांनी केलंय.

त्यांच्या विधानावर हुसैन दलवाई यांनी आक्षेप घेतलाय. हा मराठवाड्याचा अपमान आहे. तुम्हाला दुष्काळाबद्दल माहिती नसेल तर बोलू नका अशा शब्दात हुसेन दलवाई यांनी निषेध व्यक्त केला. राजपाल सिंह यांच्या विधानामुळे राज्यसभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला. जर त्यांच्या विधानात काही आक्षेपार्ह असेल तर कामकाजातून काढून टाकू असं पीठासीन अधिकार्‍यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राजपाल सिंह यांचं व्यक्त हे संतापजनक आहे. दुष्काळग्रस्ताना मदत करण्याचं सोडून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं हे कृत्य आहे. अशा विधानातून त्यांची विकृती दिसून येते. अशा नेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा