ग्रामपंचायतीचे सर्व कर भरा आणि वर्षभर गिरणीतून मोफत धान्य दळून न्या योजना

October 12, 2008 2:23 PM0 commentsViews: 39

12 ऑक्टोबर,औरंगाबाद -औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं एक अनाखी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीचे सर्व कर भरा आणि वर्षभर गिरणीतून मोफत धान्य दळून न्या अशी योजना पाटोदा ग्रामपंचायतीनं राबवली आहे. निर्मलग्राम पुरस्कार मिळवणा-या पाटोदा ग्रामपंचायतीनं वेगवेगळ्या योजना राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे. कर भरण्यासाठी ,अशी नामी शक्कल लढवून 100 टक्के करवसुली करणारं हे महाराष्ट्रातलं पहिलंच गाव ठरलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातलं 150 घरं असलेलं हे पाटोदा गाव. स्वच्छता, आदर्श शिक्षण, लोडशेडींगमुक्त गाव, हिरवळीनं नटलेलं आणि शेतीची सुबत्ता या सगळ्या गोष्टी या गावात फेरफटका मारताना दिसतात.माजी राष्ट्रपती कलाम यांच्या हस्ते आदर्श गावाचा पुरस्कार मिळवलेल्या या पाटोदा ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्रामपंचायत करांची पूर्ण वसुली होण्यासाठी संपूर्ण कर भरल्यास वर्षभराचं दळण मोफत अशी युक्ती लढवण्यात आली. या युक्तीला ग्रामस्थांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. निर्मलग्राम पुरस्कार घेणा•या या गावात 25 हून अधिक सौरउर्जेवर चालणारे दिवे लावण्यात आले आहेत. गावातला प्रत्येक गावकरी व्यक्तीगत स्वच्छतेकडे लक्ष देत असतो. गावक•यांंनी प्राथमिक शिक्षणाकडेही अधिक लक्ष दिले आहे.शाळेत स्वच्छता आणि अभ्यासाचे धडे देण्यासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आल्या आहेत.केवळ आदर्श गाव पुरस्कार मिळवण्यासाठीच इथं प्रयत्न केले जात आहेत असं नाही. तर जबाबदा•यांचं भान असलेला उद्याचा नागरिक घडवण्याचं कामच हे गाव अप्रत्यक्षपणे करताना दिसतं आहे.करवसुलीचा पाटोदा ग्रामपंचायतीचा पॅटर्न राज्यातल्या इतर ग्रामपंचायतींनी राबवला तर मोठ्याप्रमाणात करवसुली होऊन गावांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो हे मात्र निश्चित.

close