लातूरमध्ये नगरसेवकच करताय पाण्याची चोरी !

April 28, 2016 4:33 PM0 commentsViews:

28 एप्रिल : एकीकडे लातुरात लाखो लिटर पाणी रेल्वेनं आणण्याचा खटाटोप शासन करतंय. मात्र, आलेलं पाणी जातं कुठे असा प्रश्न लोकांमधून नेहमी विचारला जातोय. पाणी वितरणात सपशेल अपयशी ठरलेलं आहे. मनपा प्रशासन लोकांना पाणी देण्याएवजी नगरसेवकांची घरं भरण्याचा आंधळा कारभार करतंय. अनेक नगरसेवकांच्या घरी पिण्याच्या पाण्याचे अख्खे टँकर रिकामे होत असल्याचं समोर आलंय.latur3

लातुरात पाणीटंचाईमुळे लोक हैराण आहेत. अशा परिस्थितीत शासनानं लाखो लिटर पाणी रेल्वेनं लातुरात आणलं खरं पण या पाण्याच्या वितरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. लातूर शहरातल्या प्रभाग क्र. 20 चे नगरसेवक गिरीश पाटील यांच्या घरातील हौदात मनपाचा टँकर रिकामा होत होता. भाजपच्या नेत्या स्वाती जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो पकडला. या टँकरने तोपर्यंत अख्खा हौद भरला होता. सामान्यांना 15 दिवसांला 200 लिटर पाणी मिळते मग नगरसेवक चार हजार लिटरचा टँकर कसा काय रिचवतात असा सवाल स्वाती जाधव यांनी केला. त्यावर मनपाचे अधिकारी निरुत्तर झाले. या प्रकारावर मनपा प्रशासन बोलायला तयार नाही. या आधी देखील पाण्याच्या टँकरची खुलेआम चालणारी चोरी आयबीएन लोकमतनं उघडकीस आणली होती. मात्र, मनपा प्रशासन आंधळ्याचं सोंग घेतंय आणि जनतेचे प्रश्न मांडणारे नगरसेवकच जनतेच्या पाण्यावर डल्ला मारत आहेत. हे प्रकार कधी थांबणार हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा