अखेर हाजी अली दर्ग्यात देसाईंना प्रवेश नाहीच !

April 28, 2016 7:30 PM0 commentsViews:

28 एप्रिल : भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्यासाठी पोहोचल्या खऱ्या पण नाट्यमय घडामोडींमुुळे दर्ग्यात काही प्रवेश मिळाला नाही.  पोलिसांनी तृप्ती देसाईंनी दर्ग्याच्या अलीकडे अडवल्यामुळे देसाई यांनी ठिय्या आंदोलन करून पोलिसांचा निषेध केला. त्यातचं हाजी अली दर्ग्याचं प्रवेशद्वार बंद करण्यात आलंय. त्यामुळे तृप्ती देसाईंना प्रवेश करता आला नाही.

trupti_in_haji_ali

शनि शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात प्रवेशानंतर तृप्ती देसाई यांनी आपला मोर्चा मुंबईतील हाजी अली दर्ग्याकडे वळवला. आज ठरल्याप्रमाणे तृप्ती देसाई ‘हाजी सबके लिए’ फोरमच्या कार्यकर्त्यांसह हाजी अली दर्गा परिसरात पोहचल्या होत्या. एमआयएम आणि मुस्लिम संघटनांनी या आंदोलनाक़डून विरोध केला होता. देसाईंना कोणत्याही परिस्थिती दर्ग्यात जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. आणि घडलंही तसंच. तृप्ती देसाई यांची गाडी जेव्हा दर्ग्याच्या परिसरात पोहचली तेव्हा मुस्लिम युवकांनी गाडीवर एकच हल्ला चढवला. ‘तृप्ती देसाई चले जाओ’ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी गाडीतूनही उतरता आलं नाही. त्यांची गाडी वरळीच्या दिशेनं रवाना झाली. तृप्ती देसाईंना दर्गा परिसरात 5 वाजेपर्यंत पोलिसांनी आंदोलनाची परवानगी दिली होती. पण, आपण दर्ग्यात जाणारच, यासाठी परत येणार असं तृप्ती देसाईंनी सांगितलं. थोड्यावेळानंतर पुन्हा तृप्ती देसाई या दर्ग्याच्या परिसरात पोहोचल्यात. कोणत्याही परिस्थिती दर्ग्यात प्रवेश करणार असं देसाईंनी स्पष्ट केलं. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही वेळासाठी इथून जावं लागलं होतं असंही त्यांनी सांगितलं.

दर्गा परिसरात पोहचल्यानंतर पुन्हा एकदा मुस्लिम तरुणांनी देसाईंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात तृप्ती देसाईंनी दर्ग्याकडे कूच केली. पण, पुढे सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा देसाईंना अडवण्यात आलं. त्यामुळे त्यांना दर्ग्यात काही प्रवेश करता आला नाही. पोलिसांनीच आपल्याला अडवलं असा आरोप करत त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. त्यानंतर हाजी अली दर्ग्याचं गेट बंद करण्यात आलं. त्यामुळे तृप्ती देसाईंनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे वळवला. पोलिसांनी वाॅर्डन रोडवरच तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रोखले असता रोडवरच त्यांनी ठिया मांडला त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती. अखेरीस पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा