दुधाच्या प्रश्नावर वेळीच तोडगा काढला नाहीतर गावच्या गाव रस्त्यावर येतील-पोपटराव पवार

April 29, 2016 2:55 PM0 commentsViews:

29 एप्रिल : जसा पाण्याचा प्रश्न भेडसावतोय तसाचा दुधाचा प्रश्नही बिकट आहे. वेळेत दूधाच्या दराचं नियोजन झालं नाही तर लोकांना रडण्याची वेळ येईल. भविष्यात दुधाच्या प्रश्नावर वेळीच तोडगा काढला नाहीतर गावच्या गाव रस्त्यावर येतील. ज्या प्रमाणे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करताय त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या करतील अशी भीती हिवरबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. तसंच ज्याप्रमाणे राज्य सरकार अर्थसंकल्पीय, पावसाळी अधिवेशन घेते त्याचप्रमाणे पाणी अधिवेशन घ्यावं अशी मागणीही पोपटराव पवार यांनी आयबीएन लोकमतच्या जागर पाण्याचा परिषदेतून केलीये.popatrao_pawar3

आयबीएन लोकमत प्रस्तुत जागर पाण्याचा पाणी परिषद मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलीये. या परिषदेच्या पहिल्या सत्रात पाण्याचं समन्यायी वाटप आणि नियोजन यावर दिग्गजांनी आपलं परखड मत मांडत भविष्यातील पाणी नियोजनाचा लेखाजोखा मांडलाय. यावेळी पोपटराव पवार यांनी आपल्या शैलीत भाष्य केलं.

जलसंधारणाच्या कामात गुणवत्ता यायला हवी. तरच आपण दुष्काळाचा सामना करू शकतो. त्याचबरोबर पाण्याचा उपयोग कसा करावा याचंही प्रशिक्षण व्हावं. आज भूजल व्यवस्थापनाची नितांत गरज आहे. पाणी आणि पावसानुसार पीक नियोजन व्हावं जेणे करून येणार्‍या काळात पाणीटंचाईचा सामना करता येणार नाही असं मत पवारांनी व्यक्त केलं. तसंच यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची नव्याने स्थापना केली. राज्याच्या स्थापनेनंतर ऊस इंडस्ट्री नावारुपास आली. पूर्वी कारखान्यांमध्ये एक अंतर ठरलेलं होतं. आता साखर कारखान्यांत राजकारणी शिरल्यामुळे संख्या फोफावलीये. उसाची लागवडीसाठी शेतकर्‍यांनी सपाटा लावला आणि त्याचा परिणाम पाण्यावर झालाय असंही पोपटराव पवार म्हणाले.

‘बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांऐवजी व्यापारी देव’

ज्यावेळी 1972 च्या दुष्काळ पडला होता त्यानंतर पहिल्यांदा पाण्याच्या समन्यायी वाटपाची चर्चा झाली. त्यानंतर ही समस्या वाढत गेली. आज समुद्राचं पाणी आणण्याची चर्चा केली जात आहे. कारण, मतपेटी सुरक्षित आहे. पण आहे त्या पाण्याचं योग्य निजोजन केलं जात नाहीये. आज बाजार समित्यांमध्ये शेतकरी देव झाला पाहिजे होता पण तिथे व्यापारी झाला. आपण जमिनी खालची आद्रता संपवून टाकलीये. त्यामुळे येणार्‍या काळात वड,पिंपळासारखी झाडं नष्ट होतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

‘दूधाचा प्रश्न बिकट’

ज्या प्रमाणे पाणाचा प्रश्न आहे तसा दूधाचाही प्रश्न आहे. दुधाच्या व्यवसायाकडे गंभीर लक्ष देण्याची गरज आहे. तसं झालं नाही तर गावच्या गाव रस्त्यावर येतील. मराठवाड्यात ज्या प्रमाणे शेतकरी आत्महत्या करताय त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही हाच मार्ग पत्कारतील असं भाकीतही पवारांनी व्यक्त केलं.

‘1 जानेवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय वर्ष असावं’

शेतकर्‍यांचं शेतीचं नियोजन हे नववर्षापासून होतं. कोणती पिकं घ्यावी हे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून ठरवलं जातं. त्यामुळे त्याचबरोबर 31 मार्च ऐवजी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय वर्ष असायला हवंय अशी मागणीही पोपटराव पवारांनी केली. सामाजिक कार्यात सर्वजण पुढे आलेत. पण, पाण्याच्या विषयात फारसं कुणी पुढे आलं नाही हिच खरी शोकांतिका आहे अशी खंतही पोपटराव पवारांनी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा